*  देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न अनुत्तरित
*  नव्या आराखडय़ामुळे संकट वाढले
*  वाशी, सानपाडय़ाचे नालेही सीआरझेडमध्ये
नव्याने तयार करण्यात आलेल्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखडय़ानुसार वाशी सेक्टर सहा आणि आठ येथील धारण तलाव, कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली येथील धारण तलाव ‘सीआरझेड’मध्ये समाविष्ट होण्याची भीती आहे. याशिवाय वाशी, पाम बीच येथील सांडपाणी वाहून नेणारे मोठे नाले, अंतर्गत मध्यवर्ती नाल्यांचाही सीआरझेडमध्ये समावेश होणार आहे. यापैकी काही नाले बंदिस्त करण्याचे काम सध्या सुरू असून त्यावर वाहनतळ उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.
जयेश सामंत, नवी मुंबई
शहरातील धारण तलाव तसेच मोठे नाले सीआरझेडमध्ये समाविष्ट होत असले तरी त्यावर नवी बांधकामे उभी राहात नसल्यामुळे केवळ देखभालीची परवानगी देण्यात यावी, या स्वरूपाचा अर्ज महापालिकेने यापूर्वीच राज्याच्या पर्यावरण विभाग तसेच उच्च न्यायालयात केला आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी दिली. नव्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखडय़ात अशाप्रकारे किती नाले आणि धारण तलाव समाविष्ट होत आहेत, याचा सविस्तर अभ्यास केला जात आहे, अशी माहिती नगरचना विभागाचे प्रमुख प्रकाश ठाकूर यांनी दिली.
किनारपट्टी व्यवस्थापन आराखडय़ात भरती रेषा तब्बल एक किलोमीटर आत शिरल्यामुळे पावसाच्या पुरापासून नवी मुंबईचा वर्षांनुवर्षे बचाव करणारे धारण तलाव आणि मोठे नाले किनारपट्टी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) समाविष्ट झाले असून या तलाव-नाल्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे मनसुबे आखणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला यामुळे मोठा धक्का बसला आहे. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी नवी मुंबईची निर्मिती करताना सिडकोने जवळपास प्रत्येक उपनगरात खाडीच्या मुखावर मोठे धारण तलाव उभारले आहेत. या धारण तलावांमध्ये अनेक ठिकाणी खारफुटींची जंगले उभी राहिली असून नव्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखडय़ामुळे (एमसीझेडएमपी) शहरातील महत्त्वाचे नालेही ‘सीआरझेड’मध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथील गाळ उपसणेही यापुढे अशक्य होऊन बसणार आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या अविकसित जमिनीवर एकीकडे पाणी सोडावे लागत असताना विकसित झालेल्या नवी मुंबई शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना सिडकोने जगातील वेगवेगळ्या शहरांचा अभ्यास केला. मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे भरतीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी काय करता येईल याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यानंतर हॉलंडच्या धर्तीवर नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यांलगत धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तलावांच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी भल्या मोठय़ा धारण तलावांमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने या दरवाजांची रचना करण्यात आली. ओहोटी सुरू होताच तलावांमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून तलावांमधील पाणी खाडीत जाईल, अशी ही रचना आहे. २६ जुलैच्या मुसळधार पावसातही धारण तलावांमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांमधील पाण्याचा लवकर निचरा झाला. त्यामुळे मुसळधार पावसातही मुंबई, ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत सहसा पावसाचे पाणी तुंबून राहात नाही, याचे श्रेय या धारण तलावांना जाते.
सीआरझेडमुळे पुराचा धोका?
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने लागू केलेल्या नव्या किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र अधिसूचनेनुसार सागरी किनारपट्टीला लागू असलेल्या शहरांसाठी नवा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. नवी मुंबई क्षेत्रासाठी चेन्नई येथील अण्णा विद्यापीठामार्फत हे काम केले जात होते. हा आराखडा तयार करताना करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या काही वर्षांत नवी मुंबईची भरती रेषा खूपच आत आल्यामुळे जागोजागी खारफुटी वाढल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे नवी मुंबईतील १२४० हेक्टर जमिनीवर पाणी सोडावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ मोकळ्या जमिनींवर पाणी सोडण्यापुरता हा धोका मर्यादित नाही. नव्या किनारपट्टी व्यवस्थापन आराखडय़ात शहरातील पावसाचे पाणी खाडीपर्यंत पोहोचविणारे मोठे नालेही ‘सीआरझेड’मध्ये मोडत असल्याचे स्पष्ट होत असून यामुळे या नाल्यांची तसेच धारण तलावांची देखभाल, दुरुस्ती करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाशी, ऐरोली, नेरुळ अशा प्रमुख उपनगरांमधील धारण तलावांमध्ये यापूर्वीच खारफुटी वाढली आहे. त्यामुळे देखभालीअभावी या तलावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला असून या तलावांची पाणी साठविण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. असे असताना महत्त्वाचे नालेही ‘सीआरझेड’मध्ये समाविष्ट झाल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.