वरुणराजाची सुखद भुरभुर सुरू असताना करवीरकर नेव्ही बँडचा सूर, ताल अशा लयीच्या बरसातीत चिंब झाले होते. निमित्त होते सतेज पाटील फाऊंडेशनतर्फे ‘नेव्ही डे’ निमित्त आयोजित केलेल्या नेव्ही बँडच्या सादरीकरणाचे.
    जरगनगर रोडवरील निर्माण चौकात लेफ्टनंट कमांडर सतीश चॅम्पियनशिप यांच्या नेतृत्वाखालील ५० जणांच्या पथकाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. लाघवी शब्द, सुरेल धून यामुळे सायंकाळ सुरेल ठरली. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीन भाषांतील स्वरनिनाद सुमारे दीड तास गुंजत राहिला होता. पावसाची अखंड रिमझिम सुरू असतानाही रसिकांनी विचलित न होता अखेपर्यंत नेव्ही बँडला उत्स्फूर्त दाद देत त्यांच्या कलाविष्काराला सॅल्यूट ठोकला. विशेषत: झ्ॉलो फोनच्या सादरीकरणाने रसिक वेडावले होते.
    यानंतर लेफ्टनंट कमांडर शैलेश गायकवाड यांनी ‘नौसेनेतील करीअरच्या विशेष संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यानिमित्ताने नौसेनेतील युद्धसामग्रीच्या भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला बालक-युवकांनी प्रतिसाद दिला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तरुणांना नेव्हीत करीअर करण्याचा संदेश दिला. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते ब्रिगेडिअर विजयसिंग घोरपडे, ब्रिगेडिअर यू. डी. थोरात, कर्नल एस. एस. निकम, कर्नल विजयसिंह गायकवाड, कर्नल रतनसिंग नायकवडी, लेफ्टनंट कर्नल व्ही. ए. देसाई, मेजर जे. जे. राणा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुहास नाईक आदींचा सत्कार करण्यात आला. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.