गेल्या वर्षी नौदलात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण दुर्घटनांनंतर आता शॉर्टसर्किट होणे, वीजेच्या छोटय़ा ठिणग्या पडणे अशा प्रत्येक लहानसहान दुर्घटनाही तेवढय़ाच गांभीर्याने घेतल्या जात आहेत. शांततेच्या काळातही नौदलाचे काम तेवढेच जोखमीचे व महत्त्वाचे आहे, याची जाणीव आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही मोठय़ा दुर्घटनेला नौदलाला सामोरे जावे लागणार नाही, अशी ग्वाही नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अनिल चोप्रा यांनी बुधवारी येथे सांगितले.
नौदल दिनाच्या निमित्ताने ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जिथे जिथे माणसाचा संबंध येतो त्या त्या ठिकाणी जोखीम असणे स्वाभाविक आहे. पण नौदलाला अशा चुका परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळेच आता प्रत्येक लहानसहान दुर्घटना मग ती कितीही कमी महत्त्वाची का असेना ती तेवढय़ाच गांभीर्याने घेतली जाते. त्यामुळे शांततेच्या काळातही नौदलाचे काम तेवढेच जोखमीचे व महत्त्वाचे असते. ही जोखीम गांभीर्याने घेतल्याने आता भविष्यात नौदलाला मोठय़ा दुर्घटनेला सामोरे जावे लागणार नाही असे देशवासीयांना सांगू इच्छितो, असेही व्हाइस अॅडमिरल चोप्रा म्हणाले.
‘आयएनएस सिंधुरक्षक’च्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. तो न्यायप्रविष्ट असल्याने त्या बाबत अधिक काही सांगणे इष्ट होणार नाहीस, असे सांगून चोप्रा पुढे म्हणाले की, ‘आयएनएस सिंधुरत्न’ या पाणबुडीच्या दुर्घटनेप्रकरणी कारवाईही करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळेस हेही लक्षात घेतले पाहिजे की, त्यात ज्या दोन नौदल अधिकाऱ्यांनी प्राण गमावले त्यांच्या त्वरित कारवाईमुळेच इतर सर्वाचे प्राण वाचले.
गोदावरी वर्गातील युद्धनौका आता जुन्या झाल्याअसून त्यांच्या निवृत्तीसंदर्भातील निर्णयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. अशीच समिती ‘आयएनएस विराट’ या दीर्घकाळ वापरलेल्या विमानवाहू युद्धनौकेच्या निवृत्तीच्या निर्णयासंदर्भातही नेमण्यात आली आहे. दरम्यान पूर्णपणे भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका सध्या कोचीन गोदीत तयार होत असून ती २०१८-१९ मध्ये नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. स्कॉर्पिअन पाणबुडीची बांधणीही अंतिम टप्प्यात असून येत्या दीड- दोन वर्षांंत तीही नौदलात दाखल होईल. नव्या सरकारने आता नौदलाच्या गरजांकडे लक्ष पुरविले असून आणखी सहा पाणबुडय़ांच्या निर्मितीसही हिरवा कंदील देण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
नव्याने ताफ्यात आलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’मध्ये काही त्रुटी लक्षात आल्या होत्या. त्यातील बॉयलर्सची समस्या पूर्णपणे सुटली आहे आणि शस्त्रसंभाराच्या संदर्भातील कामही सुरू आहे. आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात अॅडमिरल चोप्रा म्हणाले की, हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाची (एलसीए) नौदल आवृत्तीही चाचण्यांच्या टप्प्यात असून तीही येत्या काही वर्षांत नौदलात रितसर दाखल होणे अपेक्षित आहे.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचे कडे अधिक कडक करण्यात आले आहे. त्यात आता सागरी पोलीस आणि स्थानिक पोलीस आदींचीही मदत घेण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या काही महिन्यांत सागरी पोलीस प्रशिक्षणासाठी नवीन अकादमी गुजरातमध्ये सुरू होत आहे. तिथे नऊ राज्यांतील सागरी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
भारतीय नौदलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर्सची संख्या कमी झाल्याचे मान्य करतानाच त्यामुळे नौदलाच्या कार्यक्षमतेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही, असे सांगून अॅडमिरल अनिल चोप्रा म्हणाले, नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने नौदलाच्या अनेक त्रुटींवर मात करण्यासाठी काही चांगले निर्णयही घेतले असून त्यात बहुक्षमतेची १६ हेलिकॉप्टर्स नौदलासाठी खरेदी करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.