सायबर गुन्ह्य़ात नक्षलवादीही आघाडीवर असून ते त्यातून त्यांचा प्रचार करतात, निधी मिळवतात. शस्त्रांची खरेदी करण्यासाठी हा पैसा उपयोगात आणतात, असा आरोप सायबर कायद्यातील अभ्यासक अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी केला आहे. जस्टा कॉझा या विधि महोत्सवासाठी नागपुरात आले असताना ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते.
विदर्भात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर नक्षलवादी फार नेटकेपणाने, प्रचारकी थाटाने करीत आहेत. त्यातून त्यांना पैसा मिळतो. त्यांनी घोटाळा करणाऱ्यांच्या टोळ्या बनवल्या आहेत. हे घोटाळे करताना त्यांची नोंद अमेरिकेत होत असतो. त्यामुळे आपण गुन्ह्य़ांचा जो शोध घेत असतो तो थांबतो. नक्षलवादी शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी सायबर गुन्हे मोठय़ा प्रमाणात करतात.
सायबर गुन्ह्य़ांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच टक्क्याने वाढ झाली आहे. मुंबईत गेल्यावर्षी २०१३-१४ मध्ये ५००च्यावर गुन्हे होते ते वाढून गेल्या नोव्हेंबपर्यंत १८५० झाले आहेत. महाराष्ट्रात केवळ शहरांमध्येच सायबर गुन्हे घडत नसून ग्रामीण भागातही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खात्यातून पैसे काढून घेण्याचे गुन्हे वाढत आहेत. असे झाल्यानंतर काय करायचे याची माहिती ग्रामिणांना नसल्याने ते हतबल आहेत. सायबर गुन्हे सोडवण्यासाठी केवळ पोलीस ठाणे न उभारता आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे वेगळे करायला हवेत. सायबर गुन्हे हाताळणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी न देता केवळ त्यासंबंधीचे गुन्हे सोडवण्यासाठी द्यायला हवेत. सायबर सेल प्रत्येक जिल्ह्य़ात स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्य़ांसंबंधीचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांची बदली नक्षलग्रस्त भागात करण्यापेक्षा ती जिल्ह्य़ातील सायबर सेलमध्येच करावी, जेणे करून त्यांनी मिळवलेले ज्ञान व प्रशिक्षणाचा सायबर गुन्हे सोडवण्यात उपयोग होईल. महिलांशी फेसबुकवर अश्लिल भाषेत बोलणे, त्यांची बदनामीचे करणे असे महिलांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्ह्य़ांची संख्या सर्वात जास्त आहे. सायबर गुन्ह्य़ाच्या सोडवणुकीत आव्हान म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील पुरावा लवकर उडणारा असतो. त्यामुळे बरीच काळजी घ्यावी लागते. तरी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात सव्वा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देणे शक्य झाले आहे. नक्षलवादी करीत असलेल्या प्रचारातून पैसे मिळवतात. त्यांच्या सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्याच सक्रिय आहेत. यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग शस्त्रास्त्रे खरेदीसाठी करीत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. विदर्भातील तरुण मुलांमध्ये फेसबुक किंवा व्हाटस् अ‍ॅपवर महिलांविषयी अभद्र, घाणेरडे लिहिण्याचे प्रमाण जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.