राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घेत स्वतंत्र निवडणूक लढविण्याची आपली हौस फिटविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्य़ात अक्षरश: पानिपत झाले असून १८ पैकी १७ जागांवर या पक्षाच्या उमेदवारांना साधे डिपॉझिटही राखता आलेले नाही. सिडकोचे संचालक नामदेव भगत, माजी खासदार दामू िशगडा यांचे पुत्र सचिन, कल्याणातील पक्षाचे नेते सचिन पोटे, ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्यासारख्या पक्षाच्या दिग्गज उमेदवारांना मतदारांनी साफ झिडकारले आहे. मीरा-भाईंदर, ठाण्यात काँग्रेसचे निरीक्षक पद मिरविणारे आमदार मुजफ्फर हुसेन यांचा शब्द प्रमाण मानून तिकीट देण्यात आलेल्या उमेदवारांनाही सपाटून मार खावा लागला असून ठाणे शहरात राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन यांचे डिपॉझिट जप्त करून ठाणेकरांनी ‘समन्वया’च्या राजकारणालाही धक्का दिला आहे.
एके काळी ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाची चांगली ताकद होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जिल्ह्य़ातील काँग्रेसला ओहोटी लागली. आघाडीच्या जागावाटपात अनेक महत्त्वाच्या जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेल्या. त्यामुळे पंरपरागत मतदार असूनही काँग्रेसची ताकद या ठिकाणी कमी होत गेली. मीरा-भाईंदर, मुंब्रा, भिवंडी यासारख्या मतदारसंघात काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांचा मोठा वर्ग होता. असे असताना जागावाटपात हे मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडत पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसचा पाय खोलात नेऊन ठेवला. जिल्ह्य़ातील सत्तावाटपात महत्त्वाची पदे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे राहिली. या नेत्यांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नेहमीच दूर ठेवले.
नवी मुंबईत गणेश नाईक यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी कधीच जमले नाही, तर मीरा-भाईंदरात गिल्बर्ट मेन्डोन्सा आणि काँग्रेस नेत्यांचे नेहमीच विळ्या-भोपळ्याचे नाते राहिले. गेल्या निवडणुकीत पालघरमधून काँग्रेसचे राजेंद्र गावित हे एकमेव आमदार निवडून आले. गावितांना पक्षाने मंत्रिपदाची बक्षिसी दिली. मात्र आपल्याच मतदारसंघात अकार्यक्षम असलेल्या गावितांना जिल्ह्य़ात काँग्रेसला बळकटी देणे कधीच जमले नाही.
काँग्रेसमुक्त ठाणे
राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेत स्वतंत्र निवडणूक लढविण्याची संधी द्या, अशी जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांची जुनी मागणी होती. यंदाच्या निवडणुकीत आघाडी मोडल्याने ही हौस फिटवून घेण्याची आयती संधी येथील नेत्यांना चालून आली. मात्र वर्षांनुवर्षे निष्क्रिय ठरलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मतदारांनी सपशेल झिडकारले असून जिल्ह्य़ातील १८ जागांपैकी १७ जागांवर पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. भिवंडी पश्चिम या मुस्लिमबहुल मतदारसंघाचा एकमेव अपवाद वगळला तर काँग्रेसला कुठेही ३० हजार मतांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. मुंब््रयातील मुस्लीम मतदार म्हणजे आपलेच असा दावा करत फिरणाऱ्या काँग्रेसच्या यासिन कुरेशी या उमेदवाराला येथून जेमतेम चार हजार मते मिळाली. नवी मुंबईत नेहमीच गणेश नाईक यांना आव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना डिपॉझिट राखता आले नसून येथे वर्षांनुर्वष सिडकोसारख्या मलईदार महामंडळावर मांड ठोकून बसणाऱ्या नामदेव भगतांना जेमतेम १६ हजार मते मिळवता आली आहेत. मीरा-भाईंदरमधील काँग्रेसचे बडे नेते मुज्जफर हुसेन यांच्या आग्रहास्तव काँग्रेसने ओवळा-माजीवडा, मुंब्रा आणि मीरा-भाईंदर अशा तीन मतदारसंघांत हुसेन सांगतील तेच उमेदवार दिले. मात्र या तिन्ही उमेदवारांना डिपॉझिट राखता आलेले नाही. यावरून हुसेन यांच्या राजकीय मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत.
मनसेच्याही १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून ठाणे महापालिका हद्दीतील चारही जागांवर या पक्षाच्या उमेदवारांना डिपॉझिट राखता आलेले नाही. राष्ट्रवादीलाही मतदारांनी झिडकारले असून या पक्षाच्या ११ उमेदवारांना डिपॉझिट राखता आलेले नाही. डावखरे पुत्र निरंजन, ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे अशा दिग्गज नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.