निफाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप मंगळवारी सुनावणीअंती फेटाळण्यात आला असून त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा जीव भांडय़ात पडला. या मतदारसंघात अन्य ३ उमेदवारांचे अर्ज वेगवेगळ्या कारणास्तव अवैध ठरविण्यात आले. यामुळे छाननीअंती या मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ५५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या २५८ झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या छाननी प्रक्रियेवेळी निफाड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बनकर यांच्या अर्ज क्रमांक २६ मधील माहिती विहीत नमुन्यात भरली नसल्याचा आक्षेप वैशाली कदम यांनी घेतला होता. यावर मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. बनकर यांनी परिपत्रक सादर करत त्या अनुषंगाने सर्व माहिती भरण्यात आल्याचे सांगितले. संबंधितांनी अर्ज भरताना कोणतीही माहिती लपविलेली नाही. यामुळे हे आक्षेप तांत्रिक कारणावरून असल्याने ते फेटाळून बनकर यांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याचे मंगरुळे यांनी सांगितले. या कारणास्तव आदल्या दिवशीच्या छाननी प्रक्रियेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. बनकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर कालच्या छाननी प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला. छाननीत वैशाली कदम, राजाराम पानगव्हाणे व कैलास हिरे यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. दोन पर्यायी उमेदवारांकडे पक्षाचे अधिकृत पत्र नसल्याने आणि एका अर्जावर दहा सूचकांऐवजी एका सूचकाचे नांव असल्याचे ते बाद झाल्याचे सांगण्यात आले. छाननीअंती आता ११ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील उर्वरित १४ मतदारसंघातील छाननी प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली होती. निफाड मतदारसंघाचा निकाल राखीव होता. हा निकाल जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यात १५ मतदारसंघात एकूण ५५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तसेच अर्ज वैध ठरलेल्या जिल्ह्यातील एकूण उमेदवारांची संख्या २५८ झाली आहे.