नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाने अनेक उमेदवारांच्या डोळ्यांत अश्रू आणले, तर अनेकांची पावले आनंदाने थिरकली. घणसोली येथील सेक्टर ९ मधील न्यू इंग्लिश विद्यालयाच्या परिसरात हे चित्र होते. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी मुख्य लढाई पाहायला मिळाली.
आपलाच उमेदवार जिंकण्यासाठी दारोदार फिरून प्रचार करणारे कार्यकर्ते व कितीच्या मताधिक्याने आपली सरशी होईल, या उत्सुकतेने रात्रभर डोळ्याला डोळा न लागलेल्या उमेदवारांनी गुरुवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी घणसोली येथील मतमोजणी केंद्राकडे मोर्चा वळवला. न्यू इंग्लिश विद्यालयाच्या पटांगणात कार्यकर्ते तर आजूबाजूच्या इमारतींच्या तळमजल्याचा आधार घेऊन उमेदवार तळ ठोकून होते. उमेदवारांची नावे पुकारल्यानंतर त्यांना मतमोजणी केंद्रावर येण्याचे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले होते. म्हणून सकाळपासून उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह न्यू इंग्लिश विद्यालयाच्या जवळच्या घरोंदा इमारतीच्या तळमजल्यावर आणि मैदानात तळ ठोकून होते. कालप्रमाणे आजही राजकीय पक्षांच्या उमेदवारांना व कार्यकर्त्यांना उन्हाचे चटके खावे लागले. अखेर सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेनेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर ‘कोण आला रे.. कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ या घोषणेने सेनेचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करीत होते, ‘करून दाखवले..’ हा नारा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, निकाल जाहीर करण्यासाठीची ध्वनिक्षेपक यंत्रणा सदोष असल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ उडत होता. विजयी उमेदवारांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर येऊन विजयाची माहिती दिल्यानंतर कार्यकर्ते जल्लोश करीत होते. या सर्व गोंधळी कारभारामुळे विजयी उमेदवारांना उचलून कार्यकर्ते प्रभागात घेऊन गेल्यावर निवडणूक अधिकारी विजयाची मते जाहीर करीत असल्याचा विचित्रपणा पाहायला मिळाला.
या केंद्रावर पोलिसांची आवश्यक तेवढी कुमक होती, मात्र उत्साही कार्यकर्ते प्रतिस्पध्र्याना डिवचण्याचे प्रकार करीत असल्याने पोलिसांचे काम वाढले. घणसोली मतमोजणी केंद्रावर विजयी उमेदवारांप्रमाणे पराजित उमेदवारांना निकालानंतर आपले अश्रू अनावर झाले.

कही दीप जले, कही दिल
ललिता मढवी या केंद्रातून रडतच बाहेर आल्या. वैभव नाईक यांच्या पत्नीला पराजयाचा सामना करावा लागला, पण त्यांच्या बहिणीला विजय संपादन करता आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. बोनखोडे गावातील पारिवारिक लढाईत लीलाधर नाईक यांचा विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला, मात्र कुटुंबातील इतर सदस्य केंद्रातून मान खाली घालून घर गाठत होते. वॉर्ड क्रमांक ३८ मधून मेघाली राऊत (शिवसेना) या सर्वात तरुण उमेदवार निवडून आल्यामुळे कोपरखैरणे येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. ही धनशक्तीविरोधात जनशक्तीची लढाई असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत होते. गुरुवारच्या निकालात दुपापर्यंत राष्ट्रवादीची खरी टक्कर सेनेशी होताना दिसली. पण बंडखोरीमुळे सेनेला ग्रामीण भागात मोठा फटका बसल्याचेही कार्यकर्ते बोलत होते. छाया केशव म्हात्रे यांच्या विजयाची बातमी मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांना समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश करीत उन्हाची तमा न बाळगता नाच सुरू केला. उत्साहाच्या भरात कार्यकर्ते तापलेल्या डांबरी रस्त्यावर लोळत होते. काही वेळाने केंद्राबाहेर आलेल्या छाया म्हात्रे यांना भोवळ आल्याने नातेवाईकांनी त्यांना सावरले. यामुळे त्यांच्या विजयाबद्दल कार्यकर्ते साशंक झाले, मात्र अखेर छायाताईंनी व्हिक्टरीची बोटे उंचावून आपण निवडून आल्याचे जाहीर केले. मात्र आपले पती केशव म्हात्रे हरल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांसाठी सीलबंद पाण्याची सोय राजकीय पक्षांनी केली असली तरीही मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पहारा देणाऱ्या पोलिसांचे मात्र हाल झाले.