केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या सत्ताबदलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पालिकेतील सत्तासोपान टिकविण्यासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजप, शिवसेनेच्या बोहल्यावर चढविणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ११ नगरसेवक अखेर तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले. नाईकांच्या या ठाम निर्णयानंतर बेलापूर, नेरुळ, वाशी आणि ऐरोली येथील सहा नगरसेवक भाजप, शिवसेनेची कास धरणार आहेत.
नवी मुंबईतील राजकीय केंद्रबिदू असणाऱ्या नाईक यांनी सोमवारी वाशी येथील भावे नाटय़गृहात आपले राजकीय मौन सोडले. त्यांची ही भूमिका ऐकण्यासाठी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या सभेला एकमेव वक्ते असणाऱ्या नाईक यांनी प्रारंभीच आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे घडय़ाळ घेऊनच निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने दोन महिने असलेले राजकीय गूढ दोन सेकंदांत संपुष्टात आले. त्यामुळे पक्षबदल करावा असे वाटणाऱ्या नगरसेवकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, तर राष्ट्रवादीतच राहावे या मताच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. जेमतेम दहा ते बारा मिनिटे केलेल्या या भाषणात नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या शिडात म्हणावी अशी हवा भरली नाही. कोणत्याही पक्षाचे, व्यक्तीचे, नाव न घेता प्रचार करा, असा संदेश देतानाच माझ्याप्रमाणे गाफील राहू नका, नाही तर तुमचा गणेश नाईक होईल, असा वडीलकीचा सल्ला मात्र ते देण्यास विसरले नाहीत. नाईक ७ मार्चपासून निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना उभारी देणाऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साडेबारा टक्केयोजनेचे जनक असलेल्या पवार यांचा या वेळी नागरी सत्कार केला जाणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात मी स्वत: निवडणुकीला उभा आहे, असा प्रचार करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यासाठी देशात नवी मुंबई पालिका कशी चांगली आहे आणि तिच्या माध्यमातून केलेल्या कामांचा पाढा मतदारांसमोर वाचला जाणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल या निवडणुकीत बदलेला दिसेल असा विश्वास त्यांनी ‘महामुंबई वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केला. नाईक यांनी पालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्षबदल करावा यासाठी प्रयत्न करणारे वाशीतील चार, नेरुळमधील तीन, सीबीडी आणि ऐरोलीतील प्रत्येकी दोन असे ११ नगरसेवक चांगलेच तोंडावर आपटले आहेत. त्यात एफएसआयमुळे प्रकाशझोतात आलेले वाशीतील नगरसेवक किशोर पाटकर यांनी तर नाईकांच्या निर्णयाची वाट न पाहता चार दिवसांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यांचा प्रभाग त्यांना अनुकूल झाल्याने यापूर्वीच्या निवडणुकांचा कल पाहता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी शिवसेनेत उडी मारली आहे. इतर नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित किंवा रचनेत गुल झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत राहणे पसंत केले आहे. यात सहा नगरसेवक नाईकांच्या निर्णयानंतर शिवसेना, भाजपची वाट धरणार आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले पक्ष सोडण्याच्या तयारी आहेत. त्यांनी पक्ष सोडल्याच्या दुसऱ्या दिवशी सभागृह नेते अनंत सुतार स्वगृही परतणार असल्याचे संकेत आहेत. चौगुले यांच्या राजकीय भूमिकेवर भाजपचे युवा नेते वैभव नाईक यांची भूमिकाही ठरणार असून तेही शिवसेनेत पुन्हा येण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, नाईकांच्या या भूमिकेने तर शिवसेना-भाजप युती करण्याचा प्रयत्न केला जाणार असून ३६ प्रभाग भाजपला, तर ७५ प्रभागांवर शिवसेनेचा दावा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी काँग्रेस नेते नारायण राणे आग्रही आहेत, पण नाईक ही आघाडी करण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस आपापली ताकद अजमावणार असून निवडणुकीनंतर आघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. नाईकांच्या भूमिकेनंतर शहरातील राजकारणाला रंग चढू लागले असून होळीनंतर आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू होणार आहे.