महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण आणि शासकीय जाहिरातीत राज्य घटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता’ वगळल्याच्या मुद्यांवरून केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज मूक आंदोलन केले.
देशात मोदी सरकार आल्यापासून धार्मिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप आणि संघाकडून महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे गोडवे गायले जात आहेत. तसेच घरवापसी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यातून समाजात दुही निर्माण होत आहे. अशा भाजप आणि संघाच्या विचारणीच्या विरोधात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरातील व्हॅरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले.   
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते होते. कार्यकर्ते तोंडावर काळ्याफिती बांधून आणि हातात भाजप, रा.स्व. संघाचे निषेध करणारे फलक घेऊन मूक आंदोलनात सहभागी झाले. यावेळी महात्मा गांधी यांच्या खून करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गात असलेल्या रा. स्व. संघाचा निषेध करण्यात आला. तसेच राज्य आणि केंद्र सरकार या संदर्भात मूग गिळून धार्मिक विद्वेषाला खतपाणी घालत असल्याबद्दल सरकारच्या धिक्कार करण्यात आला.
सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या जाहिरातीत घटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता’ हे शब्द वगळले होते. याबद्दलही राष्ट्रवादीने टीका
केली.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या गोडसचे भाजप आणि रा. स्व. संघ उदात्तीकरण करीत आहे. राज्य आणि केंद्र सरकार याबद्दल काहीही बोलायला तयार नाही. यामुळे समाजात दुही निर्माण होत आहे. या सर्व घटनाक्रमांचा आम्ही निषेध करतो, असे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले.
काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार नेतृत्वाखाली व्हॅरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आले. प्रारंभी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुत्तेमवार, नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांची भाषणे झाली. त्यानंतर आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.