राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे आणि त्याच्या विचारांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न राजकीय पाठिंब्यावर सुरू असल्याच्या निषेधार्थ गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हुतात्मा स्मारक येथे मूक आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी या स्वरुपाचे आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अथवा हुतात्मा स्मारकात आंदोलन करण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले होते. त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हुतात्मा स्मारकात एकत्र आले.
दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर देशात वाढत असलेल्या अपप्रवृत्तीच्या विरोधात एक तास मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वाचे भ्रमणध्वनी बंद करण्यात आले होते.
गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे व त्याच्या विचाराचे उदात्तीकरण करणारा मोठा कार्यक्रम राजकीय पाठिंब्यावर काही संघटनांनी सुरू केल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर, पुढची मजल म्हणजे गोडसेंचे मंदीर व पुतळे उभारण्याची मोहीम सुरू करण्याची या देशविघातक शक्तींची इच्छा आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसक आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. गांधींबद्दल ज्या पद्धतीने हे क्लेशदायक उपक्रम हाती घेण्यात आले त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी सांगितले.
आंदोलनात माजी खासदार देविदास पिंगळे, आ. जयंत जाधव, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, महिला शहराध्यक्षा सुनिता निमसे यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. शहराप्रमाणेच येवला, त्र्यंबकेश्वर, निफाड, चांदवड, नांदगाव, कळवण, देवळा, सिन्नर, सुरगाणा व पेठ आदी भागात मूक आंदोलन करण्यात आले.