लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात थेट प्रचार करणाऱ्यांवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने अजून कोणत्याही पदाधिकाऱ्यावर तशी कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादीचे दोन तीन पदाधिकारी सोडले तर बहुतांश सर्वच नेत्यांनी हाती झाडू घेतल्याचे चित्र येथे बघायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून स्थानिक नेत्यांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १० एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय देवतळे होते. देवतळेंना कांॅग्रेसच्या एका गटाने व राष्ट्रवादीचे दोन नेते सोडून अन्य गटात विखुरलेल्या एकाही नेत्याने मदत केली नाही. कांॅग्रेसने महापौर संगीता अमृतकर, नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, सभापती रामू तिवारी, शहर अध्यक्ष गजानन गावंडे, अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, धांडे, घनश्याम मुलचंदानी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परंतु विरोधात काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी देवतळे यांच्याविरोधात खुलेआम प्रचार केला. राष्ट्रवादीच्या बैठकीतच त्यांनी देवतळे यांच्या विरोधात झाडू हाती घेण्याचे आवाहन त्यांच्या पाठीराख्यांना केले होते.
तसेच वरोरा-भद्रावती मतदार संघात ते स्वत: हाती झाडू घेऊन मतदारांच्या घरापर्यंत गेले. राष्ट्रवादीचे नेते आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जाधव व जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तेव्हाच तक्रार करण्यात आली. परंतु टेमुर्डे यांना साधी कारणे दाखवा नोटीस सुध्दा पक्षाने दिलेली नाही.
टेमुर्डे यांच्यासोबतच सहकार महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनीसुध्दा बल्लारपूर, बामणी, येनबोडी, कळमना तसेच भद्रावती व वरोरा मतदार संघात देवतळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. परंतु त्यांच्यावर सुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी तर खुलेआम हाती झाडू घेतला. तर जिल्हा परिषदेचे सभापती अरुण निमजे, वामनराव झाडे तसेच राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी खुलेआम विरोधकाची भूमिका घेतली. तशा तक्रारीही प्रदेश कार्यालयाकडे करण्यात आलेल्या आहेत. परंतु या सर्वाना राष्ट्रवादीने साधी कारणे दाखवा नोटीस सुध्दा बजावलेली नाही. केवळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी देवतळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
 या दोघांशिवाय आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून राष्ट्रवादी बेपत्ताच दिसली. त्यामुळे प्रदेशपातळीवरून या नेत्यांवर कोणती कारवाई होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२४ एप्रिल रोजी मुंबईसह राज्यातील १९ लोकसभा संघात मतदान झाले. राज्यातील तिन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या झाल्यानंतर या जिल्हय़ातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.  पक्षविरोधी काम करणाऱ्या या नेत्यांशी पवार कसे भेटतात याकडेसुध्दा सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व नेत्यांनी केवळ व्यक्तिगत व्देषातून देवतळे यांच्या प्रचारापासून स्वत:ला दूर ठेवले. त्याला कारण प्रत्येकाने विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित आतापासूनच तयार करून ठेवले आहे. त्यामुळेच या सर्वानी आपचा झाडू हाती घेतला ही वस्तुस्थिती आहे. आता हाती झाडू घेतलेल्या या नेत्यांवर कारवाई होते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.