ग्राहकांना खूष करण्याच्या नादात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देत असल्याची टीका करीत शेतकरी विरोधातील धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना शेतकरी हिताची पुरेपूर काळजी घेतली जात होती, असेही त्यांनी सांगितले.
लोकांना आश्वासन व भूलथापा देऊन नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता हस्तगत केली. परंतु सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचाच पहिला बळी देण्यात येत असल्याचे हे सरकार आपल्या कृतीतून दाखवून देत असल्याची टीका भोसले यांनी केली. सुरूवातीला कांद्यावर ३०० रूपये निर्यातमूल्य लादण्यात आले. शेतकऱ्यांनी त्या विरोधात सूर लावल्यावर हे निर्यातमूल्य रद्द करण्याऐवजी त्यात वाढ करून ते ५०० रुपये करण्यात आले. त्यानंतर कांदा व बटाटा जीवनावश्यक म्हणून घोषित करण्यात आले. इतकेच नव्हे तर नेपाळ व बांग्लादेशात होणाऱ्या डाळिंब निर्यातीवर केंद्र शासनाने र्निबध लादले. हे कमी की काय म्हणून स्थानिक कुक्कुटपालन व्यवसायाला मंदीच्या खाईत लोटणारा अमेरिकेतून लेगपिस चिकन आयात करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे भोसले यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या या शेतकरी हिताविरोधातील धोरणांमुळे कांदा, डाळिंबसारख्या पिकांचे भाव गडगडले आहेत. शेतकरी आर्थिक खाईत लोटला जात आहे. तीन वर्षांपासून मालेगाव व परिसरातील तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. केंद्राने शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण बदलावे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे भोसले यांनी नमूद केले.
येथील शिवाजी पुतळ्यापासून १२ वाजता मोर्चा निघणार आहे. पत्रकार परिषदेस अ‍ॅड. आर. के. बच्छाव, तालुकाध्यक्ष गुलाब चव्हाण, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, किशोर इंगळे आदी उपस्थित होते.