अन्न सुरक्षाविषयक कायद्यांतर्गत खाणाऱ्याला संरक्षण दिले जाणार आहे. देशात धान्य तयार करणाऱ्याला संरक्षण देण्याची खरी गरज असल्याचे मत माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
शिवछत्रपती ग्रंथालयाच्या वतीने आयोजित शिवछत्रपती व्याख्यानमालेत ‘भारतीय अन्न सुरक्षाविषयक कायदा’ या विषयावर पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर प्रा. स्मिता खानापुरे होत्या.  
कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकार १ लाख १० हजार कोटी खर्च करणार आहे. त्यासाठी अन्न सुरक्षा कायदा लागू होणार आहे. स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ, गहू व ज्वारी मोठय़ा प्रमाणावर वितरित केले जाणार आहे. एक दिवसाच्या मजुरीत महिनाभर खाता येईल इतके धान्य रेशन दुकानातून मिळणार असेल तर मजूर महिनाभर काम करेल का? माणसाची क्रयशक्ती वाढवण्याऐवजी ती कमी करण्याचे काम या योजनेतून होणार आहे.  जो धान्य तयार करतो, त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. तयार करणारा जगला तरच खाणारा जगेल, हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज पटेल यांनी व्यक्त केली. ग्रंथपाल सुनील हुसे यांनी आभार मानले.