नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने भरीव तरतूद उपलब्ध करून देण्याबरोबरच कुंभमेळ्यातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्याची मागणी आ. जयंत जाधव यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना केली आहे.
आगामी काळातील नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याचाही आग्रह जाधव यांनी भाषणात धरला. सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक व त्र्यंबकेश्वरप्रमाणेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय असल्याने शासनाने त्यासाठी भरीव तरतूद करण्याची गरज आहे.
हाच विषय आ. जाधव यांनी चर्चेत मांडला. नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यान्वित केल्यास पायाभूत सुविधांना चालना मिळू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या भाषणात जाधव यांनी राज्य शासनाच्या आर्थिक धोरणांचे जोरदार समर्थन केले. यापुढील काळात आपले पारंपरिक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यांना बाजूला सारण्याची गरज व्यक्त करून राज्यभर शिरपूर पद्धतीच्या जलसंधारणाची कामे करण्यावर शासनाने भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडल्याशिवाय महाराष्ट्र हे ‘महाराज्य’ होणार नाही. त्यामुळे पाण्याचे नवे नवे स्रोत शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुष्काळावरील कायमस्वरूपी उपाययोजनांच्या संशोधनासाठी शासनाने पाऊल उचलणे आवश्यक आहे. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू करण्यासाठी तरतूद करण्याची आवश्यकता जाधव यांनी व्यक्त केली.
राज्यातील ६५ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे कृषी क्षेत्रासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे. मात्र त्याचबरोबर मंजूर असलेला निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करण्याची गरज त्यांनी मांडली. राज्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजूर निधीपैकी निम्मासुद्धा निधी राज्य सरकार खर्च करू शकलेले नाही. त्यामुळे फक्त तरतुदी करून उपयोग नाही तर निधी खर्च झाला पाहिजे, हेही जाधव यांनी लक्षात आणून दिले.