उरण तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये येथील अनेक नैसर्गिक नाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हे नाले तुंबले असून अनेक ठिकाणी हे नाले अरुंद होऊ लागले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या पावसाळ्यात येथील गावात पावसाचे पाणी शिरण्याची भीती येथील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
उरण परिसरात अनेक ठिकाणी रस्ते, पूल तसेच विविध प्रकारच्या बांधकाम व गोदामांची उभारणी सुरू आहे. ही विकासाची कामे सुरू असताना या कामांसाठी येथील नैगर्सिक पाणी निचऱ्याची ठिकाणे असलेले नाले मातीच्या भरावाने बुजविले जात आहेत. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे येणारे तसेच ओहोटीच्या वेळी समुद्रात जाणाऱ्या पाण्याचे मार्गच बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी रुंद असलेले हे नाले मातीच्या भरावामुळे अरुंद झाले आहेत. तर काही नाले हे घाणीने भरल्याने यातील पाणी जाण्याचे मार्गही बंद पडले आहेत. पावसाळ्यात समुद्राच्या भरतीबरोबर होणाऱ्या जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढून गावात पाणी शिरून पुरस्थिती निर्माण होते. ही स्थिती रोखण्यासाठी पाण्याचे नैसर्गिक नाले मोकळे करण्याची गरज आहे. परंतु ते बुजविले जात असल्याने उरणमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
जसखार, भेंडखळ, सोनारी, फुंडे आदी गावांना गेल्या वर्षी त्याचे परिणाम भोगावे लागले असून पावसाचे पाणी साठून घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता उरण तालुक्यात ग्रामपंचायती, गावा शेजारील विविध कंपन्या, आस्थापने यांच्या अखत्यारीत येणारे नैसर्गिक नाले व पाणी निचऱ्याची स्थाने मोकळी करण्याची गरज आहे. त्याकरिता त्यांना महिनाभरापूर्वीच पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या २९ मे रोजी या संदर्भात कामाचा आढावा घेण्यासाठी सिडको, जेएनपीटी, ओएनजीसीसारखी आस्थापने व ग्रामपंचायतींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले.