बालपणात आजारपणामुळे आलेल्या बौद्धिक अक्षमतेवर मात करत आपल्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करणाऱ्या गोरेगावच्या नेहा नाईक या तरुणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. विशेष मुलांसाठी आयोजिल्या जाणाऱ्या ‘स्पेशल ऑलिंपिक्स’च्या माध्यमातून मुंबईची ही मुलगी ‘इंटरनॅशनल ग्लोबल मेसेंजर’ (आयजीएम) म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करते. २३ वर्षांच्या नेहाला आता आयजीएम म्हणून वाशिंग्टन येथे ‘व्हाइट हाऊस’मध्ये दस्तुरखुद्द बराक आणि मिशेल ओबामा यांच्या समवेत भोजन करण्याची संधी मिळणार आहे. प्रतिकूलतेतही अनुकूलता साधत असा मान मिळविणारी नेहा भारतातील एकमेव तरुणी आहे.
पाच वर्षांची असताना मेंदूज्वरामुळे नेहाला बौध्दिक अक्षमता आली. तोपर्यंत नेहा इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे होती. पण, नंतर इतर मुलांप्रमाणे अभ्यासात तिला प्रगती साधता येईनाशी झाली. सुदैवाने तिच्या आईवडिलांनी तिची विशेष प्रशिक्षणाची गरज तेव्हाच ओळखली आणि त्यांनी गोरेगाव येथील ‘पुनर्वास’ या विशेष मुलांच्या शाळेत नेहाला घातले. तेव्हापासून नेहाची प्रगती होत गेली. अभ्यासात ती भलेही इतर मुलांची बरोबरी करू शकली नाही. परंतु, स्वत:ला नेमक्या शब्दांत व्यक्त करणे, आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविणारी संभाषण कला, वक्तृत्व यात नेहा इतर मुलांना मागे टाकून अनेक पावले पुढे गेली. तिच्यातले हे वैशिष्टय़ ओळखून २०१३मध्ये कोरियामध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये नेहाला भारताची अ‍ॅम्बेसेडेर म्हणून निवडण्यात आले. नेहाने तर या संधीचे अक्षरश: चीज केले.
विशेष मुलांच्या गरजा, भारताचे महत्त्व, आपली जडणघडण या विषयी तिने ऑलिम्पिक्समध्ये केलेल्या प्रभावी भाषणांमुळे तिची निवड ‘इंटरनॅशनल ग्लोबल मॅसेंजर’ म्हणून करण्यात आली. स्पेशल ऑलिंपिकबरोबरच आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या दृष्टीने या १२ आयजीएमचे नेतृत्त्व विकसित केले जाते. तिच्यासोबत हा मान मिळविणारी अन्य देशांची आणखी ११ मुले होती. या १२ जणांना ओबामांनी ३१ जुलैला जेवणाचे निमंत्रण दिले आहे. नेहा तिच्या मार्गदर्शक जॉनीता रॉड्रीक्झ यांच्यासमवेत व्हाइट हाऊमध्ये होणाऱ्या या पार्टीला हजेरी लावणार आहे.
आतापर्यंत नेहाने कोरियासह मोरोक्को, सिंगापूर, वॉशिंग्टन, ग्रीस, थायलंड अशा परदेश वाऱ्या केल्या आहेत. आता भारताच्या स्पेशल ऑलिंम्पिक्स कार्यक्रमाअंतर्गत नेहा खेळामध्ये रस असलेल्या विशेष मुलांना खेळ, शिकविणे, वाचन, लेखन असे प्रशिक्षण देण्याचे काम करते. नेहाला मैत्री करायला आवडते. स्पेशल ऑलिंम्पिक्सच्या निमित्ताने तिने जगभर खूप साऱ्या मित्रमैत्रिणी जमा केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ती त्यांच्या संपर्कातही असते, अशी माहिती तिच्या आई आशा नाईक यांनी दिली.