* स्टाफ नर्सच्या सर्वाधिक जागा भरणार
* डॉक्टरांची भरती होणार
* आरोग्य विभागाच्या विस्तारीकरणाचे प्रयत्न सुरू
 नवी मुंबई महापालिकेने आरोग्य विभागाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून येत्या तीन महिन्यांत तब्बल १५४ जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेने ऐरोली तसेच नेरुळ येथे १०० खाटांचे दोन तर बेलापूर येथे स्वतंत्र्य माताबाल रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय आरोग्य विभागाअंतर्गत बायोमेडिकल इंजिनीअिरग विभाग येत्या काळात सुरू करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणासाठी नव्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज असून त्यामुळे ही भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी वृत्तान्तला दिली.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत महापालिकेचे वाशी येथे प्रथमसंदर्भ रुग्णालय असून या ठिकाणी शहरातील सर्वसामान्य रुग्णांना रुग्णसेवा पुरवली जाते. नवी मुंबईचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता महापालिकेने ऐरोली आणि नेरुळ येथे १०० खाटांचे दोन रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात असून त्यासाठी महापालिकेने सुमारे ५० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. ऐरोली आणि नेरुळ अशा दोन रुग्णालयांमुळे वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयावर पडणारा रुग्णांचा भार बराच कमी होणार आहे. हे करत असताना महापालिकेने बेलापूर येथे माताबाल रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शहरात पाच माताबाल रुग्णालये अस्तित्वात असून बेलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा चेहरा आधुनिक असेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णालयीन व्यवस्थेला बळकटी आणत असताना आरोग्य विभागाच्या अंतर्गत बायोमेडिकल इंजिनीअिरग विभाग सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एकीकडे हे विस्तारीकरण सुरू असताना आरोग्य विभागात आवश्यक असा कर्मचारी वर्ग भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यांत तब्बल १५४ जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ तसेच डय़ूटी मेडिकल ऑफिसर अशा महत्त्वाच्या पदांचाही समावेश आहे. याशिवाय स्टाफ नर्स, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ऑक्झिलरी नर्स अशा पदांची निर्मितीही केली जाणार आहे.