जड वजनाच्या, गंजलेल्या, रस्त्यात अस्ताव्यस्त पडलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या बॅरीकॅट्सने अलीकडे नवीन रूप धारण केले आहे. शहरातील शंभरपेक्षा जास्त तपासणी नाक्यांवर नवीन बॅरीकेट्स थाटात उभ्या असल्याचे दिसून येत आहे. नव्याने आलेल्या या ३०० बॅरीकेट्सच्या तळाशी चाके लावण्यात आल्याने ते सहज हलविले जाऊ शकतात. तपासणी नाक्यावर वजनाने जड असणाऱ्या बॅरीकेट्स लावण्यास टाळाटाळ करणारे पोलीस ही चाके असणारे बॅरीकेट्स मोठय़ा हौसेने लावत असल्याचे दिसून येते.
लोकसंख्येच्या तुलनेने नवी मुंबई शहर इतर शहरांपेक्षा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारीतही त्याच प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. विविध प्रकारचे गुन्हे केल्यानंतर गुन्हेगार शहराबाहेर पळून जाण्यास अनेक मार्गाचा अवलंब करीत असतात. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचा जास्त वापर होत आहे. त्यामुळे शहरातून बाहेर पडणाऱ्या या मार्गावर नाकाबंदी करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर अनेक वेळा येऊन पडते. पंजाबमधील दहशतवादी हल्ला आणि याकूब मेमन फाशी प्रकरणामुळे राज्यातील पोलिसांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे मोठे काम पोलिसांना पार पाडावे लागत आहे. यात मद्य प्राशन करून गाडी चालविणारे तळीरामही पोलिसांच्या हाती लागत आहेत.
तपासणी नाक्यांवर रस्त्याच्या कडेला असलेली बॅरेकेट्स किंवा पोलीस वाहनामधून बॅरीकट्स आणून लावताना पोलिसांना नाकीनऊ येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. गंजलेली, जड वजनाची बॅरीकेट्स बदलण्याचा निर्णय उपायुक्त शहाजी उमाप यांनी काही दिवसांपूर्वी घेतला. त्यासाठी एमआयडीसीतील चांगल्या कंपन्या, वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांचे सहकार्य घेण्यात आले. त्यांच्या जाहिरातीच्या बदल्यात हे बॅरीकेट्स बनवून घेण्यात आले असून त्यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जाहिरातीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणाऱ्या उद्योजक व संस्था यांना जाहिरात करण्यासाठी चार इंचांची जागा सोडण्यात आली आहे. एका बॅरेकेट्ससाठी आठ हजार रुपये खर्च आला असून स्वयंचलित चाकांचा त्यात जास्त खर्च आहे. या बॅरेकट्सच्या खाली फायबरचे चाक बसविण्यात आल्याने पोलिसांना बॅरेकट्स आता हलविणे सोपे झाले आहे.

सीसी टीव्ही लावण्याचे आवाहन
घरफोडी, बँकेतील व्यवहार, चेनचोरी, फसवणूक, वाहनचोरी, वाहनातील साहित्याची चोरी, लहान मुलांसंदर्भातील गुन्हेगारी, संगणक, इंटरनेट गुन्हे या गुन्हय़ांविषयी सात लाख पत्रकांचे वाटप करून गुन्हय़ाची माहिती व उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम उमाप यांनी यापूर्वी केले आहे. या पत्रकाबरोबर उच्च पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलीस उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी कोण्या लोकप्रतिनिधीवर अवलंबून न राहता आता सर्वसामान्य माणूसदेखील त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहे. ऐरोलीतील फॅन्चेला अपहरण व खून प्रकरणानंतर सोसायटीतील सीसी टीव्हींचे महत्त्व अधोरिखित झालेले आहे. सोसायटीत सीसी टीव्ही नसल्यानेच फॅन्चेलाच्या अपहरणाचा पुरावा ऐरोली टोलनाक्यावरील सीसी टीव्हीमुळे प्राप्त झाला. त्यामुळे सर्व सोसायटींना सीसी टीव्ही लावण्यासंदर्भात लवकरच एक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार असून सोसायटींनी केवळ आपल्या क्षेत्रफळापुरता आणि दुकानदारांनी आपल्या दुकानासाठी सीसी टीव्ही न लावता सोसायटी दुकानांसमोरील मुख्य रस्त्यावरील हालचालीदेखील टिपता येतील असे कॅमेरे लावावेत, असे आवाहन उमाप यांनी केले आहे, जेणेकरून पोलिसांना अधिक तपास करताना या पुराव्याचा उपयोग होणार आहे.

पोलिसांची कार्यपद्धत आणि आधुनिकीकरण यात दिवसेंदिवस बदल होत असून तपासणी नाक्यावर चांगले बॅरेकेट्स असण्याची आवश्यकता वाटत होती. त्यामुळेच शहरातील उद्योजक आणि बँका यांच्याबरोबर चर्चा करून एकाच आकाराचे व रंगाचे बॅरेकेट्स बनविण्यात आलेले आहेत. ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर हे बॅरेकेट्स ठेवण्यात आल्याने गुन्हेगारांना त्याचा वचक बसणार आहे. हलक्या व हलविण्यास सोपी असलेली ही बॅरेकेट्स लावण्यात पोलिसांना आता अधिक श्रम पडणार नाहीत. त्यामुळे जुने बॅरेकेट्स बदलणे ही काळाची गरज होती.
शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, नवी मुंबई</p>