महिला सुरक्षेसाठी विविध हेल्पलाइन तसेच इतर अनेक प्रयत्न सरकारी पातळीवरून होत आहेत. यातच सध्याच्या स्मार्टफोनमध्येही ‘एसओएस’ प्रणालीचाही सुरक्षेसाठी वापर केला जातो. पण या सगळ्या गोष्टींचा वापर होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत बराच वेळ जातो. यामुळे प्रत्यक्ष घटना घडते त्या वेळेस सुरक्षा व्हावी या उद्देशाने काहीतरी उपाययोजना असावी म्हणून विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील चार विद्यार्थ्यांनी एक जॅकेट तयार केले असून धोका असलेल्या ठिकाणी या जॅकेटवरील एक बटण दाबल्यास त्यात विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि समोरच्या व्यक्तीला शॉक बसतो.
महिला सुरक्षेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नात आणखी भर घालण्याच्या दृष्टीने सुरक्षा अ‍ॅप्स किंवा हेल्पलाइन विकसित करण्यापेक्षा घटनास्थळी महिलांना उपयुक्त ठरेल अशी काहीतरी गोष्ट तयार करावी अशी संकल्पना समोर आली आणि तंत्रनिकेतनातील सरहिन कमल, मर्लिन सिनोज, रश्मी मोरे आणि सगुप्ता शेख या चौघींनी एक जॅकेट विकसित करण्याचे काम हाती घेतले. या जॅकेटमध्ये मायक्रो कंट्रोलर वापरण्यात आले आहे. ज्याच्या साह्य़ाने जॅकेटमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि समोरच्या व्यक्तीला शॉक लागण्यास सुरुवात होते. रात्री एकटय़ाने प्रवास करताना किंवा कोठेही प्रवास करताना भीती वाटल्यास महिला हे जॅकेट घालू शकते. सध्या हे जॅकेट मोठे आणि तुलनेत वजनाने जड आहे. पण यात काही तांत्रिक आणि रचनात्मक बदल करून हे जॅकेट हलके करण्याचा मानसही सरहीनने व्यक्त केला. याचबरोबर लवकरच हे उत्पादन बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ती म्हणाली. सध्या या जॅकेटचे प्रारूप नाशिक येथील एका प्रदर्शनात ठेवण्यात आले असून तेथे ते लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचे तिने स्पष्ट केले.
ल्ल हे जॅकेट घालून जात असताना जर काही प्रसंग घडला तर तेथील एक बटन सुरू करायचे. ते बटन सुरू केल्यावर एक मोठा बझर वाजतो जेणेकरून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष त्या ठिकाणी वेधले जाईल आणि जॅकेटमध्ये प्रवाह सुरू होतो. जर समोरच्या व्यक्तीने महिलेला हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला शॉक बसेल. जॅकेटच्या आतल्या बाजूस सिलिकॉन कवचाचा वापर केल्यामुळे ज्या व्यक्तीने जॅकेट घातले आहे तिला शॉक बसत नाही. याशिवाय यामध्ये ब्लूटूथ जोडणी देण्यात आली आहे. हे जॅकेट ती महिला ब्लूटूथद्वारे आपल्या मोबाइलशी जोडून ठेवू शकते. मोबाइलमध्ये यासाठी एक अ‍ॅपही तयार करण्यात आले आहे. जॅकेटवर असलेले आणखी एक बटण दाबल्यास ब्लूटूथच्या मदतीने मोबाइलमधील जीपीएस सुरू होते आणि अ‍ॅपमध्ये आधीच लोड करून ठेवण्यात आलेल्या त्या ठिकाणचे संपर्क क्रमांकांवर संदेश पोहोचतो आणि तातडीने मदत मिळू शकते अशी माहिती सरहीन हिने दिली. याचबरोबर यात मोबइलमध्ये वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅक्सेरोमीटरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे जर ती मुलगी धावत असेल तर ती कोणत्या वेळी कुठल्या ठिकाणावर होती याची माहितीही तातडीने मिळू शकते असेही सरहीनने स्पष्ट केले.