चल डय़ुटी मारने जाना है.!
‘त्या’ तिघी एकमेकांच्या दूरच्या नातेवाईक. तिघीही सर्वसामान्य घरातल्या. भरपूर पैसे कमवायचे आणि मौज करायची ही इच्छा. ध्येयपूर्तीसाठी मग सराफांना गंडा घालण्याचा उद्योग सुरू झाला. या उद्योगाचा कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या तिघी ‘चल डय़ुटी मारने जाना है’, असा सांकेतिक शब्द वापरू लागल्या. तिघीही बुरखा परिधान करायच्या. सराफाला संशय येऊ नये यासाठी त्यापैकी एक वयस्कर महिला चेहरा उघडा ठेवायची, तर दोघी बुरख्याने पूर्णपणे चेहरा झाकायच्या. मोठय़ा घराण्याशी संबंधित आहोत हे भासविण्यासाठी आलिशान कार भाडय़ाने घ्यायची आणि हातचलाखीने दागिने लुटायचे, असा त्यांचा उद्योग. एका तपासादरम्यान या तिघींची हातचलाखी पोलिसांनी उघड केली.
नसरीन फारुक शेख (३५, रा. शहाड), नजमा अब्दुल शेख (४०, रा. आंबिवली) आणि बेगम चाँदमिया शेख (५०, रा. मोहने), अशी या तिघा महिलांची नावे आहेत. या तिघीही कल्याण तालुका परिसरात राहत असून, त्या एकमेकींच्या दूरच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकींकडे ये-जा सुरू असते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची पाश्र्वभूमी असलेल्या या तिघींनाही भरपूर पैसा कमवायला हवा, असे नेहमी वाटायचे. या तिघींची एक नातेवाईक अट्टल गुन्हेगार असून ती हातचलाखीने सराफांच्या दुकानातील सोन्याचे दागिने लंपास करायची. पैसा कमवायचा, मग असेच काही तरी करायला हवे, असे ठरले. झटपट पैसे कमवून श्रीमंत होण्याचा मार्ग तिघींनी निवडला. बडय़ा घरातील आहोत असे भासविण्यासाठी त्या भाडय़ाने कार घेऊ लागल्या. ठाणे, पुणे, वापी, असा प्रवास सुरू झाला. ओळख पटू नये आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडू नये यासाठी तिघीही बुरखा परिधान करीत होत्या. सराफाला संशय येऊ नये म्हणून त्यापैकी बेगम शेख ही महिला चेहरा उघडा ठेवायची. त्यामुळे सराफही बेसावध व्हायचे आणि ग्राहक म्हणून त्यांच्यापुढे सोन्याचे दागिने मांडायचे. याच संधीचा गैरफायदा घेत त्या हातचालाखीने सोन्याचे दागिने लंपास करायच्या. भाडय़ाने घेतलेल्या गाडीच्या चालकालाही याविषयी थांगपत्ता त्या लागू द्यायच्या नाहीत. कुटुंबातील कुणालाही हे उद्योग कळू नयेत यासाठी शिर्डी तसेच अन्य ठिकाणी दर्शनासाठी जात असल्याचे सांगत होत्या. सराफाला गंडा घालण्याला जायचे ठरले तर ‘त्या’ तिघी एकमेकींना ‘चल डय़ुटी मारने जाना है’ अशा सांकेतिक शब्दात बोलायच्या आणि त्यासाठी सकाळी लवकरच घराबाहेर निघायच्या, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफाच्या दुकानामध्ये ऑक्टोबर महिन्यात तीन महिलांनी हातचालाखीने सोन्याचे दागिने लुटून नेले होते. या गुन्ह्य़ाच्या तपासादरम्यान या तिघींना अटक केली. त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला.

16संगणक विकणारा सीए
त्याचा लेखापरीक्षण (सी.ए) चा व्यवसाय. घोडबंदर मार्गावरील हिरानंदानी इस्टेटसारख्या उच्चभ्रू वसाहतीत तो राहातो. पण धंद्यात तोटा झाला आणि तो कर्जात बुडाला. या चक्रातून बाहेर कसे पडायचे आणि कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या विवंचनेतून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. मग त्याने मंत्रालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा नवा व्यवसाय थाटला. पहिला गुन्हा पचल्याने त्याची हिम्मत वाढली आणि तो अनेकांना गंडा घालू लागला. मात्र एका व्यापाऱ्याच्या हुशारीमुळे तो वर्तकनगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि त्याचे फसवणुकीचे आठ गुन्हे उघड झाले. दीपक गोिवद प्रभू असे या उच्चशिक्षित भामटय़ाचे नाव असून, त्याचे फसवणुकीचे किस्से ऐकून पोलीसही अवाक झाले आहेत.
ठाणे शहरातील वैतीवाडी परिसरात गणेश तुळशीराम गुंजाळ (२७) राहत असून त्यांचा कॉम्प्युटर सेल्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसचा व्यवसाय आहे. दीपक गोविंद प्रभू याने ‘जस्ट डायल’ कंपनीच्या माध्यमातून गणेश यांच्याशी संपर्क साधला. ‘मंत्रालयात वरिष्ठ पदावर कार्यरत असून तिथे दैनंदिन कामासाठी संगणकाची गरज भासते. त्यामुळे संगणक खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी निविदा भरून द्या’, असे त्याने दूरध्वनीवरून त्यांना सांगितले. मंत्रालयात संगणक विक्रीचे काम मिळणार असल्याने गणेशही भारावले आणि ते दीपक सांगेल तसे वागत गेले. संगणक खरेदीच्या निविदा प्रक्रियेसाठी दीपकने त्यांना स्वत:चा ई-मेल आयडी दिला होता. स्वत:च्या ई-मेल आयडीवरूनच निविदेचा अर्ज पाठवून तो पुन्हा भरून देण्याचे दीपकने त्यांना सांगितले. त्याप्रमाणे गणेश यांनी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर दीपकने त्यांना निविदा मंजूर झाल्याचे पत्र धाडले. या पत्रामुळे काम मिळाल्याची शाश्वती मिळताच गणेश यांनी निविदेप्रमाणे संगणक डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेतला. पण, मंत्रालयात संगणकाचा ऐवज पाठविण्याऐवजी हिरानंदानीमधील घरी पाठवा, असे दीपकने सांगितले. त्यानुसार त्यांनी एक लाख ६३ हजार ३८५ रुपयांचे संगणक त्यांच्या घरी पाठविले. मात्र संगणक देऊनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश यांनी वर्तकनगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बंगाळे यांच्या पथकाने सापळा रचून दीपकला अटक केली आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दीपकने यापूर्वी अशाप्रकारे आठ गुन्ह्य़ांमध्ये अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
व्यापाऱ्यांना गंडा घालून त्यांच्याकडून विकत घेतलेला ऐवज विक्री करण्यासाठी दीपकने एका एजंटची नेमणूक केली होती. वर्तकनगर येथील फसवणुकीच्या गुन्ह्य़ातील एक लाख ६३ हजार ३८५ रुपये किमतीचे संगणक पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत. याशिवाय ठाण्यातील वर्तकनगर, कासारवडवली आणि मुंबईतील नवघर, आग्रीपाडा आदी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्य़ातील संगणक, लॅपटॉप, टॅब आणि ९५ हजारांची रोकड, असा १२ लाख ९९ हजार ९०८ रुपयांचा ऐवजही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती मोनिका राऊत यांनी दिली.