मुंबईच्या पश्चिम उपनगरासाठी आणखी एक स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याचा तब्बल पाच वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर आज आकाराला आला. गोरेगावपासून दहिसपर्यंतच्या वाहनधारकांच्या ‘नंबर प्लेट’ला आता ‘एमएच-०२’ ऐवजी, ‘एमएच-४७’ अशी नवी ओळख मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते दहिसर (प.) येथील कांदरपाडा परिसरातील नव्या परिवहन कार्यालयाचे उद्घाटन झाले. आता तरी परिसरातील रिक्षाचालकांच्या मनमानीवर थोडाफार अंकुश बसेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वाहनचालकाचे शिकाऊ आणि कायमस्वरूपी परवाने मिळविण्यासाठी तसेच नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी अंधेरी परिवहन कार्यालयात होणारी गर्दी या कार्यालयामुळे आटोक्यात येणार असून बोरिवली परिवहन कार्यालयाच्या हद्दीत राहणाऱ्या वाहनधारकांना त्यांच्या वाहन नोंदणीसंबंधीच्या सर्व नोंदी आता एमएच-४७ कार्यालयात, म्हणजे बोरिवली आरटीओकडे स्थानांतरित कराव्या लागणार आहेत. येत्या आठवडाभरात शिकाऊ वाहनचालक परवान्यासाठीच्या चाचण्यादेखील या कार्यालयामार्फत सुरू होतील, नव्या वाहनांची नोंदणीदेखील मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ाअखेरीसच सुरू होईल, असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाहनचालकाच्या परवान्यासाठी ऑगोदरच ऑनलाईन अर्ज केलेल्यांना बोरिवलीचे कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत अंधेरी कार्यालयातच संपर्क साधावा लागेल, असे हा अधिकारी म्हणाला. वाहनचालकाच्या चाचणीसाठी मालाड मालवणी येथे अद्ययावत चाचणी मार्गिका बांधण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असे या सूत्रांनी सांगितले. पश्चिम उपनगरांत रिक्षाचालकांच्या मुजोरीविरुद्ध आणि मनमानीबद्दल वाढत्या तक्रारी कायमच सुरू असतात. मात्र, त्यांच्याबद्दलच्या तक्रारींसाठी बोरिवली दहिसरमधून अंधेरीचे परिवहन कार्यालय गाठणे वेळखाऊ आणि खर्चीक ठरत असल्याने तसेच परिवहन अधिकाऱ्यांचे अस्तित्वही या परिसरात फारसे जाणवत नसल्याने रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप लावणे प्रवाशांना शक्य होत नव्हते. आता परिवहन कार्यालय हाकेच्या अंतरावर आल्याने, अशा बेदरकार रिक्षाचालकांना थेट परिवहन कार्यालयाच्या दरवाजाशी घेऊन जाऊन त्याच्याविरुद्धची तक्रार नोंदविणे शक्य होईल, असे मत बोरिवली-कांदिवलीतील त्रस्त प्रवाशांपैकी काहींनी व्यक्त केले.