वनस्पती आणि पशुपक्ष्यांच्या अनेकविध जातींना सामावून घेणाऱ्या बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सापाची एक नवीन जात सापडली आहे. उद्यानातील आदिवासी पाडय़ावरील एका घरात संध्याकाळी शिरलेल्या सापाला पकडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रांना या पाहुण्याचे पहिल्यांदा दर्शन घडले. शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.००च्या सुमारास राष्ट्रीय उद्यानातील त्रिमूर्ती पाडय़ावरून सुमीत खुटाळे या तरुणाला फोन आला. घरात साप शिरला असल्याने त्याला पकडण्यासाठी स्थानिकांनी त्याला बोलावले होते. राष्ट्रीय उद्यानात वनविभागाच्या वसाहतीत राहणाऱ्या १९ वर्षांच्या सुमीतला लहानपणापासून वन्यजीवांची आवड आहे. याचवर्षी त्याला राष्ट्रीय उद्यानाकडून सर्पमित्र असल्याचे ओळखपत्रही मिळाले आहे. सुमीत व त्याचा १७ वर्षांचा मित्र किरण रोकडे पाडय़ावर पोहोचले तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते. एका घरात भिंत व पत्र्याच्या मधोमध पहुडलेल्या या सापाची ओळख पटत नव्हती. पाच दहा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर या दोन्ही मित्रांनी त्याला पकडून जवळच्या पिशवीत ठेवले.
हा साप ते पहिल्यांदाच पाहत होते. त्यामुळे तो नेमका कोण आहे हे त्यांना निश्चित सांगता येईना. घरी आल्यावर त्यांनी निलीमकुमार खैरे यांचे ‘सर्प : मित्र मानवाचा’ हे पुस्तक संदर्भासाठी पाहिले आणि या नव्या पाहुण्याचे नाव त्यांना कळले. पश्चिम घाटात नेहमी आढळणाऱ्या मांजऱ्या या सापाचा हा दुसरा (फोरस्टन कॅट स्नेक ) प्रकार होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मातकट (ब्राऊन) रंगाचा मांजऱ्या साप आढळतो. मात्र हा काळ्या- पांढऱ्या रंगाचा होता. त्याची लांबी साडेतीन फूट आहे. लांबीने लहान असला तरी तो पूर्ण वाढ झालेला साप होता. सामान्यत: या सापाची लांबी पाच फुटांपर्यंत असते.  हा साप निशाचर असून निमविषारी आहे. झाडावर चढून तो भक्ष्य शोधतो. पक्ष्यांची अंडी, पिल्ले, सरडा, बेडूक हे त्याचे अन्न. ‘अन्नाच्या शोधात तो वस्तीत आला असावा,’ असे सुमीत खुटाळे म्हणाला.  
‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ५४ प्रकारचे साप आढळतात. त्यात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चार विषारी सापांचाही समावेश आहे. मातकट रंगाचा मांजऱ्या साप उद्यानात आढळतो. मात्र काळ्या- पांढऱ्या रंगाची ही जात पहिल्यांदाच सापडली आहे,’ असे पर्यावरण तज्ज्ञ कृष्णा तिवारी म्हणाले.