गेल्या दशकभराच्या प्रयत्नानंतर भारतातील एचआचव्ही बाधितांची संख्या ५७ टक्यांनी कमी झाली आहे. २००० साली एचआयव्हीची बाधा झालेल्यांची संख्या दोन लाख ७४ हजार होती. २०११च्या अखेरीस एक लाख १६ हजार नवीन रुग्ण आढळून आले. एकीकडे एचआयव्ही होऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येत असताना एचआयव्ही व एड्सच्या रुग्णांवरील उपचाराच्या नव्या दिशेचाही शोध वेगाने सुरू आहे. यातूनच अशा रुग्णांना दीर्घकाळ चांगले आरोग्यदायी जीवन उपलब्ध होणार आहे.
‘ह्यूमन हेल्थ केअर अँण्ड रिसर्च फाऊंडेशन’ने एचआयव्ही रुग्णांवरील नव्या दिशेचा शोध गेली अनेक वर्षे चालविला आहे. यातूनच जगभरातील यविषयावरील नवे संशोधन, उपचार पद्धती, चाचण्या व औषधे यांची माहिती जागतिक पातळीवरील तज्ज्ञ डॉक्टरांना भारतात पाचारण करून येथील डॉक्टर व याक्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना देण्याचे व्रत ह्यूमन हेल्थ केअर अँण्ड रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व विख्यात डॉक्टर दत्तात्रय सापळे यांनी चालवले आहे.
भारतात एचआयव्हीचा पहिला रुग्ण १९८६ साली सापडला. तेव्हापासून आजपर्यंत एचआयव्ही रुग्णावर उपचार करण्यास अनेक डॉक्टर टाळाटाळ करताना दिसतात.
यामागे वैद्यकीय वर्तुळातच असलेले अज्ञान कारणीभूत असून याचा फटका रुग्णांना बसतो. अशावेळी एचआयाव्ही-एड्सच्या रुग्णांवरील उपचाराच्या नव्या दिशांची माहिती तसेच समज-गैरसमज दूर करण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. सापळे हे करत असून यासाठी गेली चार वर्षे जागतिक पातळीवरीव तज्ज्ञांन बोलावून परिषदेचे आयोजन करत आहेत. येत्या ५ व ६ जानेवारीस जुहू येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेला देशभरातील पाचशेहून अधिक डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान तसेच आफ्रिकी देशातील एड्स क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक एचआयव्ही रुग्णांवरील उपचाराबाबत जगात नव्याने झालेले संशोधन, त्याचे परिणाम, रुग्णांना होणारे फायदे, रुग्णांची मानसिकता आदींवर मार्गदर्शन करणार असल्याचे या परिषदेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय सापळे यांनी सांगितले.