बुधवारी मद्याच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तसेच ‘स्टंट’ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपुरात पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात राहणार असून बुधवारी सूर्य मावळतीला जात असतानाच रस्त्यांवर जागोजागी पोलिसांचे दर्शन होईल. त्यातील बहुतांश ‘गन मॅन’ राहतील. ‘जल्लोष करा, पण जपून’ असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
अंबाझरी, फुटाळा तसेच शहरातील इतर उद्यानांमध्येही पोलीस तैनात राहतील. गुन्हे शाखा तसेच खास कमांडो प्रशिक्षित महिला पोलिसांची पथके शहरात फिरणार आहेत. ही पथके विशेषत: छेडखानी करणाऱ्यांवर पाळत ठेवतील. विविध हॉटेल्समध्ये संगीत कार्यक्रमांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अशा हॉटेल्समध्येही साध्या वेषातील पोलीस तैनात राहतील. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीत गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खामला ते जीएस कॉलेज चौक दरम्यान वेस्ट हायकोर्ट रोडवर सायंकाळपासून ठिकठिकाणी कठडे लावले जातील. या रस्त्याने पायी फिरता येईल. मावळत्या वर्षांला निरोप व नव्या वर्षांच्या स्वागताचा क्षण साजरा करण्यास पोलिसांसह कुणाचाही विरोध नाही. नागरिकांना जल्लोष करता येईल मात्र, गोंधळ घालणारे, छेडखानी करणाऱ्यांना थेट गजाआड केले जाणार आहे. स्टंट करणाऱ्यांना वेळीच जेरबंद केले जाईल. आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल, छत्रपती नगर उड्डाण पुलासह शहरातील सर्व उड्डाण पूलही वाहतुकीसाठी बंद राहतील.
मद्यधुंद वाहन चालकांना थेट गजाआड घालण्यासही पोलीस मागेपुढे पाहणार नसून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचे क्रमांक जागोजागी विखुरलेले पोलीस टिपतील आणि नव्या वर्षांत त्यांच्यावर कारवाई करतील. नव्या वर्षांत पोलिसी कारवाईचा कागद हाती पडेल किंवा प्रत्यक्ष पोलीसच दारात दिसेल तेव्हा मद्यपींची धुंद क्षणात उतरलेली असेल. सीताबर्डी, फुटाळा, अंबाझरी, गांधीनगर, धरमपेठ, सदर, महाल, वर्धमाननगरसह शहराच्या विविध ठिकाणी पोलीस तैनात राहतील.
शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक आणि फुटाळा तलावावरील रस्ता बुधवारी सायंकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. उपनिरीक्षकासह दहा पोलिसांचा समावेश असलेली पथके पहाटेपर्यंत गस्त घालतील. वाहतूक पोलिसांचाही त्यात समावेश आहे. श्वास विश्लेषक यंत्रे त्यांच्याजवळ राहतील.
ग्रामीण भागातील विविध धाबे, हॉटेल्समध्ये मोठय़ा प्रमाणावर मद्याचे घोट रिचवून मध्यरात्रीनंतर घराकडे जाताना जोशात, बेभान वाहने दामटली जातात आणि अपघातांसारख्या दुर्दैवी घटना घडतात. अवैध दारू विकणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही सांगण्यात आले आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असला तरी सभ्यतेने जल्लोष साजरा करणाऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. शहर पोलिसांतर्फे शहराच्या विविध भागात नागरिकांना गुलाब पुष्पाद्वारे शुभेच्छा दिल्या जाणार असून नव्या वर्षांत सहकार्याचे आवाहन केले जाणार आहे. पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह, अतिरिक्ति पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, दीपक पांडेय, उपायुक्त अभिनाश कुमार, निर्मला देवी, इशू सिंधू, दीपाली मासिरकर, श्रीप्रकाश जयस्वाल, संजय लाटकर, विजय पवार, भारत तांगडे यांनी नागरिकांना नवीन वर्षांच्या शुभेच्या दिल्या असून ‘जल्लोष करा, पण जपून’ असा सल्लाही दिला आहे.