नवे वर्ष, नव्या संकल्पना, नवी उभारी.. मावळतीला निरोप आणि उगवतीचे स्वागत.. आयुष्यातला प्रत्येक क्षण कसा ‘एन्जॉय’ करायचा, हे तरुणाईने ज्येष्ठांना शिकवले आणि तरुणाईच्या साथीने ज्येष्ठांनीही गेल्या काही वर्षांत ‘एन्जॉयमेंट’ची ही संकल्पना स्वीकारली. त्यामुळे फक्त तरुणाईसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे रूप पालटून ज्येष्ठांसाठीही तेवढय़ाच उत्साहाने कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यासाठी वर्धा, अमरावती, उमरेड मार्गावरच्या धाब्यांपासून तर पंचतारांकितपर्यंतची हॉटेल्स सज्ज झाली आहेत.
मावळत्या वर्षांला निरोप आणि उगवत्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे ‘एन्जॉयमेंट’च्या मुडमधल्या तरुणाईला, ज्येष्ठांना आणि सोबतच कुटुंबालासुद्धा आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल, त्यांना कसे कमीतकमी किमतीत चांगले पॅकेज देता येईल यासाठी या हॉटेल्समध्ये स्पर्धा लागली आहे. ५०० रुपयांपासून तर १०, २० आणि २५ हजार रुपयांपर्यंतच्या या पॅकेजमध्ये डान्स, ड्रामा, गेम्स, बक्षिसे या सर्वाचा अंतर्भाव आहे. अमरावती मार्गावरील ‘चोकरदानी’ या राजस्थानची आठवण करून देणाऱ्या ठिकाणावर ‘पधारो २०१५’, उमरेड मार्गावरील ‘अडवाणी धाबा’ने ‘एन्जॉय ५१’, तर सक्करदरा तलावाजवळील बॉलीवूड सेंटर पॉईंट या हॉटेलमध्ये ‘झकास २०१५’ या नावाने वेगवेगळे ‘एन्जॉयमेंट पॅकेज’ उपलब्ध करून दिले आहेत. आनंद साजरा करण्याची कोणतीच संधी नागपूरकर सोडत नाही आणि त्यासाठी खिसा रिकामा करायलासुद्धा ते मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे ही संधी नागपुरातील हॉटेल्ससुद्धा हेरतात आणि नागपूरकरांसाठी वेगवेगळे पॅकेज तयार करतात. गेल्या काही वर्षांत ‘डीजे’ या प्रकाराला प्रचंड मागणी आहे. संगीताची सरमिसळ करत तयार होणाऱ्या नव्या संगीताच्या तालावर तरुणाईच नव्हे तर आबालवृद्ध अशा सर्वाचेच पाय थिरकतात. यावेळीसुद्धा पुण्याहून डीजे स्नित, मुंबईहून डीजे प्रतिक, डीजे रोहीत, डीजे अली आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. तर झी टीव्हीवरील ‘डान्स इंडिया डॉन्स’ची प्रसिद्ध नृत्यांगणा शक्ती मोहन, ‘सारेगमपा’चे पारुल आणि विश्वजीत त्यांच्या नृत्य आणि गाण्यांच्या तालावर नागपूरकरांना थिरकवणार आहेत. इलेक्ट्रिक डान्स म्युझिक आणि अमेझिंग लेजर फॅब्रिक व लेजर फाईट शो हे यावर्षीचे खास आकर्षण आहे. ‘एन्जॉयमेंट पॅकेज’ला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद असल्याचे हॉटेल सन अँड सॅनचे राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
हॉटेल्समधील या कार्यक्रमांव्यतिरिक्त शहरातील फुटाळा चौपाटी, वेस्ट हायकोर्ट रोड, सदर आदी भागातही तरुणाई तेवढीच ‘एन्जॉय’ करते. मद्यधुंद होऊन वेगाने गाडी चालवण्याचा प्रकार गेल्या काही वषार्ंत बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला असला तरीही असा काही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना मात्र त्यावर करडी नजर ठेवावी लागणार आहे.