महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यांचे वार्ताकन अतिशय जबाबदारीने आणि काळजीपूर्वक तसेच सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून व्हावे. यासंदर्भात समाज आणि प्रसारमाध्यमांनी ‘जागल्या’ची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा अमेरिकेतील केंट स्टेट विद्यापीठातील पत्रकारिता आणि संज्ञापन विद्यालयाच्या सहप्राध्यापक व मिडिया लॉ सेंटर फॉर एथिक्सच्या संचालक जॅन लिच यांनी गुरुवारी मुंबईत व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि अमेरिकी वकिलात यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या ‘महिलांशी संबंधित गुन्हे, त्या संदर्भातील वार्ताकन आणि खबरदारी’ या विषयावर बोलत होत्या. महिलांवरील अत्याचार किंवा या संदर्भातील गुन्ह्य़ांच्या बातम्यांचे वार्ताकन खूप जबाबदारीने, काळजीपूर्वक आणि सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून लिच म्हणाल्या की, अशा बातम्यांची पूर्णपणे शहानिशा करून आणि संबंधित महिलेवर अन्याय होणार नाही आणि तिला न्याय मिळेल, अशा प्रकारे दिल्या जाव्यात.
केवळ ‘हाय प्रोफाईल’ महिलांच्या बाबतीत घडलेल्या गुन्ह्य़ांनाच प्रसिद्धी मिळू नये तर समाजाच्या तळागाळातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्याही त्यांना न्याय मिळेल, अशा प्रकारे द्याव्यात. तसेच अशा बातम्या दिल्यानंतर आपले कर्तव्य संपले म्हणून न थांबता अशा बातम्यांचा शेवटपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.