हिवाळ्याची चाहूल लागण्याआधीच गुजरातहून मुंबईकडे स्थलांतरीत होणाऱ्या हजारो रोहित पक्ष्यांना (फ्लेमिंगो) निलोफर वादळाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वादळाची चाहूल लागल्याने कच्छच्या रणात राहिलेल्या पक्ष्यांच्या घरटय़ांचीही वादळात वाताहत होण्याची शक्यता असून पक्ष्यांच्या स्थलांतरावरही त्याचा परीणाम होऊ शकेल. यावर्षी उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील हजारो पक्षी मृत्यूमुखी पडले होते तसेच प्राण्यांवरही संकट ओढवले होते. गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या निलोफर वादळामुळेही रोहित पक्ष्यांवरही तसे संकट ओढवण्याची शक्यता आहे. कच्छच्या रणातील कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दहा हजारांहून अधिक रोहित पक्षी मुंबई, ठाण्याच्या किनाऱ्यावर स्थलांतर करतात. जूनमध्ये पाऊस सुरू होण्याआधी हे पक्षी स्वगृही परततात. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पक्षी मुंबईत येण्यास सुरुवात होते. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे सरकत असलेल्या निलोफर चक्रीवादळामुळे या पक्ष्यांची कच्छच्या रणामधील घरटी आणि मुंबईपर्यंतचा प्रवास धोक्यात आला आहे. वादळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली असली तरी कच्छच्या रणात असलेल्या फ्लेिमगो सिटीला बसणाऱ्या तडाख्याचा अंदाज अजूनही पर्यावरणप्रेमींना करता येत नाहीय. कच्छच्या रणात यावर्षी अगदीच कमी पाऊस झाल्याने तेथील पक्षीजीवन आधीच संकटात सापडले आहे. त्यामुळे यावर्षी अधिकाधिक पक्षी मुंबई व परिसरात पाण्याच्या शोधात येतील, असा अंदाज होता. मात्र आता निलोफर वादळामुळे हे स्थलांतर लांबण्याची शक्यता आहे. पक्ष्यांच्या घरटय़ांची वाताहत झाल्यास स्थलांतरित पक्ष्यांची संख्या रोडावण्याचाही अंदाज आहे.
’ स्थलांतर करत असलेल्या पक्ष्यांना वाऱ्याची दिशा, लहरी यांचे ज्ञान असते तसेच काही पक्षी तर थेट हिमालयातून येत असल्याने त्यांना हिमवादळाचाही अनुभव असतो. त्यामुळे केवळ एका वादळामुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही, अर्थात महाराष्ट्रात पडलेल्या गारपिटीमुळे हजारो पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना यावर्षी घडली आहे.
अतुल साठय़े,
‘बीएनएचएस’चे संपर्क अधिकारी

’ निलोफर वादळ नालिया बंदराजवळ आदळणार आहे. या वादळाचा मार्ग फ्लेमिंगो सिटी असलेल्या कच्छच्या रणातून जात असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. या ठिकाणी लाखो फ्लेमिंगो पक्ष्यांची चिखलाची घरटी आहेत. या वादळामुळे या घरटय़ांची तसेच पक्ष्यांच्या पिलांची वाताहत होण्याची शक्यता आहे. वादळ असल्याने स्थलांतर करायला निघालेल्या पक्ष्यांनाही त्रास होऊ शकतो.
आदेश शिवकर, पक्षी अभ्यासक

’ वादळामुळे कच्छच्या भागात पूर आल्यास मात्र फ्लेमिंगोंच्या घरटय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकेल. वादळ किनाऱ्यावर आदळल्यावर फ्लेमिंगो सिटीपर्यंत वारे किती वेगाने जातात, पक्षी या वादळामुळे उत्तरेकडे सरकतात का, स्थलांतर करत असलेल्या पक्ष्यांची दिशा बदलते का, दिशा बदलल्यानंतरही पक्षी पुन्हा मुंबईच्या दिशेने वळतात का हे पाहणे, पर्यावरण अभ्यासकांसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे.
डॉ. परवीश पंडय़ा, पक्षीतज्ज्ञ