विदर्भातील ज्येष्ठ होमियोपॅथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. विलास डांगरे यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येत असल्यामुळे या दोन नेत्यांमध्ये राजशिष्टाचारानुसार कुणाला महत्त्व दिले जाणार आहे, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
डॉ. विलास डांगरे यांचा ९ नोव्हेंबरला वसंतराव देशपांडे सभागृहात जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा असताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. शपथविधी सोहळा आटोपला. त्यानंतर फडणवीस यांचे नागपूर नगरीत जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने नागपुरात दोन सत्ता केंद्रे निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातही बोलबाला वाढल्यामुळे त्यांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठेतील बंगल्यावर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वर्दळ वाढली आहे, त्यामुळे सहाजिकच फडणवीस यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. त्यामुळे एरवी गडकरी शहरात नसताना त्यांच्या वाडय़ाकडे जाणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता फारसे फिरकताना दिसत नाही. शपथविधी सोहळ्याच्यावेळी गडकरी यांची उपस्थित राहणार आहे.
फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून नागपुरात प्रथमच आगमन झाले, त्यावेळी गडकरी उपस्थित राहतील असे वाटत असताना ते आलेच नाही. दरम्यानच्या काळात फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांच्या सहकार्याने शहराचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगून गडकरी यांच्याशी कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता डॉ. विलास डांगरे यांच्या सत्काराच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत असून यावेळी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. खासगी कार्यक्रम असला तरी राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमात पहिले भाषण गडकरी यांचे होणार की फडणवीस याबाबत चर्चा होऊ लागली आहे. आयोजकांसमोर पहिले कुणाचे भाषण ठेवायचे हा पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. डॉ. विलास डांगरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक एकत्र येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय वळण देऊ नये, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली. नितीन गडकरी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान मोठे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.