nitin-gadkariनाही नाही म्हणत अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस काल बुधवारी दणक्यात पार पडला. याच गडकरींनी एक दिवस आधी नेपाळमधील भूकंपाचा हवाला देत वाढदिवस साजरा करणार नाही, असे जाहीर केले होते. घोषणा एक करायची आणि कृती भलतीच, असे राजकारण्यांच्या बाबतीत नेहमीच घडते. काही दिवसांपूर्वी पराभूत नेते अनिल देशमुख व व आता गडकरी याच मार्गाने जाताना दिसले. त्यामुळे राजकीय नेत्यांचा खरा चेहरा कोणता, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
 राज्याच्या उपराजधानीचे खासदार आणि केंद्रातील एक मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे प्रमुख नेते आहेत. सामान्य जनतेची नाडी ओळखणारे, विकासकामांच्या बाबतीत सदैव दक्ष असणारे, अशीही त्यांची ओळख आहे. आता एवढय़ा मोठय़ा नेत्याचा वाढदिवस म्हणजे साऱ्या पक्षवर्तुळात आनंदाला उधाण येणारच. कार्यकर्ते ढोलताशे बडवणारच, शहर विद्रुप करणारे फलक सर्वत्र झळकणार, हे ओघाने आलेच. त्यामुळे आपल्या या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी साऱ्यांनी जय्यत तयारी केलीच होती. आनंद साजरा करण्याच्या विविध पद्धतीनुसार अनेकांनी वेगवेगळे बेतही आखले होते. एक दिवस आधी अचानक गडकरींच्या कार्यालयातून प्रसिद्धीसाठी एक पत्रक निघाले. वाढदिवस साजरा करायचा नाही, अशा आशयाचा मजकूर असलेल्या या पत्रकात देशात, तसेच शेजारच्या नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचा हवाला देण्यात आला होता. या नैसर्गिक आपत्तीत मोठी जीवितहानी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर समर्थकांनी हा दिवस साजरा करू नये, ते शोभून दिसणार नाही. तसेच हा दिवस साजरा करण्याऐवजी भूकंपग्रस्तांना मदत करावी, असा सल्लाही या पत्रकातून देण्यात आला होता. गडकरींच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. माध्यमांनी त्यांच्या भूमिकेला प्रसिद्धी दिली, पण झाले भलतेच.
अगदी दुसऱ्याच दिवशी गडकरींचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा झाला. कार्यकर्त्यांनी, पक्षनेत्यांनी, तसेच गडकरींना नेते मानणाऱ्या अनेक नामांकित कंपन्यांनी गोळा केलेल्या लाखोंच्या निधीतून मोठमोठय़ा जाहिराती सर्वत्र झळकल्या. शहरात ठिकठिकाणी मोठे फलक लागले. हा आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र चढाओढ दिसून आली. गडकरींच्या महालातल्या वाडय़ावर समर्थकांची प्रचंड गर्दी होती. येणाऱ्या प्रत्येकाला मिठाई दिली जात होती. वाडय़ाबाहेर ढोलताशांचा दणदणाट होता. स्वत: गडकरी सुद्धा प्रत्येकाच्या अभिवादनाचा स्वीकार करताना दिसत होते. आपला वाढदिवस असा जल्लोषात साजरा करणाऱ्या एकाही कार्यकर्त्यांला अथवा नेत्याला गडकरींनी हटकल्याचे ऐकण्यात आले नाही. या जल्लोषात भूकंपग्रस्तांची आठवण कुठच्या कुठे विरून गेली होती. भूकंपाचे नाव घेत कळवळा दाखवणारे हेच का ते नेते, असा प्रश्न पडावा व त्याचे उत्तर सापडू नये, असाच एकूण माहोल होता.
हे सर्व बघून नेते असे का वागतात, असा प्रश्न अनेकांना पडला. हेच करायचे होते तर वाढदिवस साजरा करू नका, असे पत्रक काढायचेच नव्हते. ते तरी कशाला काढले, असाही प्रश्न काहींना पडला. काही दिवसांपूर्वी असाच नैसर्गिक आपत्ती व बळीराजाच्या व्यथेचा हवाला देत माजीमंत्री अनिल देशमुखांनी वाढदिवस साजरा करणार नाही, असे जाहीर केले. आपण फारच मोठे महान कार्य करतो आहोत, या थाटात त्यांनी समर्थकांनी दिलेल्या जाहिराती वर्तमानपत्रांनी प्रकाशित करू नये, असा सल्लाही देऊन टाकला होता. तरीही जाहिराती झळकल्याच. आपली सध्याची अवस्था काय, समर्थक किती, त्यातले जाहिरात देणारे कोण, याचाही अंदाज अनेक वर्षे मंत्री राहून देशमुखांना येऊ नये, हे आश्चर्यच म्हणायचे. वाढदिवस साजरा करू नका, असे लोकांना सांगत त्यांच्याचकडून हा दिवस साजरा करून घेणारे हे नेते एकाच माळेतले मणी असल्याचे मात्र सिद्ध झाले आहे.