‘एका इमारतीच्या बांधकामात आयुष्याची कमाई करण्याचे दिवस आता सरले आहेत. त्यापेक्षा बिल्डरांनी एका इमारतीत कमाई करण्याऐवजी दहा इमारती बांधून आर्थिक उलाढाल वाढवावी, कमी नफ्याची अपेक्षा ठेवावी, एक कोटी रुपयांची घरे घेणारे ग्राहक या देशात केवळ एक टक्का असून एक टक्का ग्राहकांसाठी रियल इस्टेट इंडस्ट्रि चालविणे योग्य नाही. त्यामुळे गरीब लोकांना परवडतील अशी घरे बिल्डरांनी भविष्यात बांधण्यास प्राधान्यक्रम द्यावा’ अशा शब्दात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी समस्त बिल्डरांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे गडकरी यांना आमंत्रित करून चूक तर नाही ना केली अशीच भावना आयोजकांच्या चेहऱ्यावर होती.
बिल्डर असोशिएशन ऑफ नवी मुंबईच्या वतीने वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात चार दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गडकरी यांनी बिल्डरांची स्पष्ट शब्दात कानउघडणी केली. काही वर्षांपूर्वी देशाचा विकास दर ८.५ पर्यंत गेला होता. तो आता ४.२ वर येऊन स्थिरावला आहे. त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती धीम्यागतीने सुरू असून ही प्रगती वाढण्यासाठी पायाभूत सुविधा आणि घरबांधणी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया कठीण झाली आहे, पण भूमिपूत्रांना प्रकल्पात सामावून घेऊन नवीन प्रकल्प उभारता येण्यासारखे आहेत. अनेक बिल्डरांच्या गृहनिर्मितीतील घरे विक्रीविना पडून आहेत. घरे विकली जात असल्याचा बिल्डरांचा दावा खोटा असून रियल इस्टेटमध्ये मंदी असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे बिल्डरांनी यापुढे दहा लाख रुपये किमती आतील गरीबांना परवडतील अशा घरांची निर्मिती करणे आवश्यक आहे. बँकांचे वाढलेले कर्ज दर कमी करणे बिल्डरांच्या हातात नाही. भारत सरकार त्या दृष्टीने विचार करीत आहे, पण जादा नफ्याच्या मागे न जाता बिल्डरांनी कमी बांधकाम खर्चात गरिबांसाठी घरे बांधून द्यावीत. गडकरी यांनी बिल्डरांनी सुरू केलेल्या एककलमी कार्यक्रमाचा असा पर्दाफाश केल्याने बिल्डरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. बिल्डरांच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमाला येऊन त्यांनाच कानपिचक्या दिल्याने हा चर्चेचा विषय झाला.

सर्व विरोधक एका व्यासपीठावर
या कार्यक्रमाला महापौर सागर नाईक, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, हे उपस्थित होते. या कुटुंबाच्या कट्टर विरोधक बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे आयोजकांनी निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकण्याचे टाळले होते. पण म्हात्रे यांनी आगरी हिसका दाखविताच त्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यामुळे नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना त्यांनी याठिकाणी आर्वजून उपस्थिती लावली. एक दिवस तुम्हाला मला कार्यक्रमाला बोलवावे लागेल हा दिलेला मी शब्द खरा करून दाखविला असा टोलाही त्यांनी आयोजकांना भाषणात हाणला. त्याचबरोबर नाईक यांचे भाजपवासी पुतणे वैभव नाईक व गतनिवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि राजकारण संन्यास घेतलेले सुरेश हावरेदेखील उपस्थित होते. यात शिवसेनेच्या नेत्यांना मात्र टाळण्यात आल्याचे दिसून आले.