नवी मुंबई महानरगपालिकेच्या परिवहन सेवेला पुरस्कार मिळालेला असताना दुसरीकडे मात्र बस नसल्याने प्रवाशाचा खोळंबा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या दैनंदिन हजारो प्रवांशाना परिवहनच्या बसेस वेळेत येत नसल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एनएमएमटीच्या या प्रकारामुळे प्रवाशी संतापले असून बस थांब्यावर मुंबईच्या धर्तीवर वेळापत्रक फलक बसवण्याची मागणी होत आहे.परिवहन सेवेच्या बसेसने ठाणे-बेलापूर मार्गावर, कोपरखरणे-पनवेल मार्ग, वाशी-कल्याण-डोंबिवली, वाशी-ऐरोली-मुलुंड या ठिकाणी दैनंदिन हजारो चाकरमानी आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र सध्या परिवहन सेवेच्या बसेस नियोजित वेळेत येत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. कळवा, दिघा परिसरातील वाशीकडे येणाऱ्या प्रवांशाना तब्बल तासभर बसची वाट पाहावी लागत आहे. तर मुलुंड आणि ऐरोलीकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवांशाना दर २५ मिनिटांनी एक बस उपलब्ध होत आहे. याहीपेक्षा विदारक परिस्थिती म्हणजे कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवांशाना सकाळ आणि संध्याकाळ कामाचे वेळापत्रक वगळता दुपारच्या सत्रात बसेस कमी असल्याने इतर परिवहन सेवांचा आधार घ्यावा लागत आहे. परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून बसेस कमी असल्याचे कारण सांगत गाडी वेळेवर येत नसल्याचे सांगण्यात आले. तर परिवहन सेवेच्या वाशी, ऐरोली, कोपरखरणे या डेपोंमध्ये प्रवाशांकरिता बसेसचे वेळापत्रकच नसल्याने नेमकी गाडी कधी येते आणि कधी जाते यांची माहिती नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. परिवहनच्या बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवांशाना खासगी वाहनांचा आधार घेत नियोजित स्थळी जावे लागत आहे. मात्र त्यामुळे परिवहनचा महसूल बुडीत जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे प्रवांशाकडून बोलले जात आहे. अनेकदा डेपोमध्ये बसेसच्या माहितीकरिता प्रवाशांकडून दूरध्वनी केला जातो. मात्र तिथे असणारे अधिकारी असमाधानकारक उत्तरे देत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. २४ तास कार्यरत असणारी प्रवासी हेल्पलाईन सेवा सुरू करण्याची मागणी देखील बाहेरून आलेल्या प्रवाशांकडून होत आहे.

बसथांब्यावर वेळापत्रकांची मागणी
परिवहन सेवेने लाखो रुपये खर्चून शहरात अनावश्यक ठिकाणीदेखील बस थांबे उभारले आहेत. मात्र त्यात पैसे खर्च करण्यापेक्षा बेस्टच्या धर्तीवर नवी मुंबई शहरातही बस थांब्यालगत बसेसचे वेळापत्रक आणि मार्गफलक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

परिवहनच्या आधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून आढावा घेण्यात येईल. परिवहन कर्मचाऱ्यांकडून कामात दिरंगाई होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे परिवहन आधिकांऱ्याने आदेश देण्यात येतील.
      – साबू डॅनियल, परिवहन सभापती

रात्रीच्या वेळेला ट्रान्स हार्बर मार्गावरून ठाण्याकडे जाणारी शेवटची लोकल गेल्यानंतर अनेकदा आम्ही एनएमएमटीच्या बसेसची वाट पाहत उभे राहितो, पंरतु नियोजित वेळेत बस न आल्याने आणि बसेसचे वेळापत्रक बस थांब्यावर नसल्याने त्याचा नाहक त्रास सोसावा लागला. नियोजित वेळेत बस न येणे ही आता नित्यांची बाब झाली असून परिवहनने आपला कारभार सुधारायला हवा.
– सूरज भांडे, प्रवासी