मुंबई व पुणे येथे डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात नाहीत. नागपुरात मात्र डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखवल्याविनाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहितीच प्राप्त होत नसल्याने शहरात कोणत्या आजाराने किती लोकांचा मृत्यू झाला, याची आकडेवारीच गोळा होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 

मुंबई-पुण्यात कोणतीही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यानंतर संबंधित विभागाचा डॉक्टर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहिती गोळा करतो. त्यानंतर त्या मृत व्यक्तीचे प्रमाणपत्र दिले जाते. स्मशानभूमीत हे प्रमाणपत्र दाखवले जात नाही, तोपर्यंत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारच केले जात नाहीत. हे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी महापालिका एखाद्या विशिष्ट संस्थेकडे करारानुसार सोपवते. वृद्धापकाळाने मृत्यू झाला असेल तर तसा आणि अन्य आजाराने मृत्यू झाला असेल तर तसा उल्लेख प्रमाणपत्रात केला जातो. या पद्धतीमुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला, तसेच कोणत्या आजारामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण काय आहे, याची माहिती प्राप्त होते. त्यानुसार तशा उपाययोजना करण्यास संबंधित महापालिकेला मदत होते.
३० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात असे होत नाही. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले जातात. नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून मृत्यूचे कारण प्रमाणपत्रात नोंदवले जाते. बऱ्याचदा दीर्घ आजाराने मृत्यू झाला, असे सांगितले जाते, पण नेमका आजार कोणता होता, याची माहितीच सांगितली जात नाही. त्यामुळे नागपूर शहरात कोणत्या आजारामुळे किती लोकांचा मृत्यू होतो, याची माहितीच बाहेर येत नाही.
शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास कोणत्या आजाराने मृत्यू झाला याचे प्रमाणपत्र प्राप्त होते. पण घरी मृत्यू झाला तर तो नेमका कशाने झाला याची नोंदच होत नाही. शहरात घरी मृत्यू होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहेत.
शहरात दररोज ४० ते ५० नागरिकांचा विविध कारणाने मृत्यू होतो. अशा व्यक्तींचे मृतदेह स्मशानभूमीत नेऊन धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातात. कोणत्या कारणाने मृत्यू झाला, त्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू नये, असे मत शहरातील बुद्धीवादी व्यक्त करत आहेत. असेच मत मेडिकलमधील कर्करोग विभाग प्रमुख डॉ. के.एम. कांबळे आणि अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. तसेच प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेने एखाद्या स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करावी, असेही ते म्हणाले.

प्रमाणपत्र देणारी संस्था नाही
नागपूर शहरात महापालिकेतर्फे असे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहिती उपलब्ध होत नाही, हे खरे आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरचे प्रमाणपत्र आणावे, असा शासनाचा एक आदेश असून या आदेशाच्या प्रती प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रमाणपत्र नसले तरी अंत्यसंस्कार होतात. त्यामुळे नातेवाईकही दुर्लक्ष करतात. नातेवाईक यावेळी दु:खात असतात, त्यामुळे त्यांच्यावरही प्रमाणपत्रासाठी जबरदस्ती केली जात नाही. नागरिकांनीच प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ही एक चळवळ झाली पाहिजे.
डॉ. अशोक उरकुडे,
नागपूर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी