तांत्रिक कारण तसेच विदेशी पर्यटक न मिळाल्याने ‘डेक्कन ओडिसी’ ही पंचतारांकित रेल्वे मुंबईहून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पोहोचू शकली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरची डेक्कन ओडिसीची दुसरी खेपसुध्दा रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व रेल्वे विभागाने संयुक्तपणे पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून डेक्कन ओडिसी ही पंचतारांकित रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथून थेट चंद्रपूरला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विदेशी पर्यटक घेऊन येणे असा हा कार्यक्रम आहे. या सात दिवसांच्या पॅकेज टूरमध्ये मुंबई-चंद्रपूर या रेल्वे मार्गावरील पेंच व्याघ्र प्रकल्पासह अन्य तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांचासुध्दा समावेश आहे. एका व्यक्तीसाठी ३.५० लाख रुपये तिकीट असलेल्या या गाडीत किमान ८० विदेशी पर्यटकांची नोंदणी असणे बंधनकारक आहे. ८० पर्यटकांची नोंदणी नसेल तर ही गाडी रद्द केली जाते. त्यामुळे पॅकेज टूरचे आयोजन करताना एकही नोंदणी रद्द होऊ नये याची काळजी घेतली जाते. डेक्कन ओडिसीचा पहिला पॅकेज टूर हा ६ ऑक्टोबरला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा होता. परंतु तांत्रिक कारणामुळे तसेच पर्यटकांची नोंदणी हाऊसफुल्ल न झाल्यामुळे ही खेप रद्द करण्यात आली. ६ ऑक्टोबर रोजी डेक्कन ओडिसीच्या माध्यमातून ताडोबात विदेशी पर्यटक येणार म्हणून रिसोर्ट मालक तसेच जिप्सी चालक प्रतीक्षेत होते. परंतु गाडी रद्द झाल्याची माहिती आल्याने सर्वाचा हिरमोड झाला.
या संदर्भात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गरड यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे तसेच पर्यटकांची नोंदणी न झाल्याने गाडी येऊ शकली नाही, अशी माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. दरम्यान, ३ नोव्हेंबरला डेक्कन ओडिसीची दुसरी खेप आहे. मात्र ३ नोव्हेंबरचा टूर सुध्दा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमटीडीसी व रेल्वे विभागाने नोंदणी सुरू केली असले तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानेच हा टूर रद्द होऊ शकतो असे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबई-चंद्रपूर या रेल्वे मार्गावर या स्पेशल गाडीसाठी साधारणत: १५ दिवसांपूर्वीच सर्व माहिती रेल्वे विभागाला द्यावी लागते. परंतु तशी कुठलीही व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नसल्याची माहितीही समोर आली आहे. या वर्षी डेक्कर ओडिसीचे ताडोबात २१ टूर होते. पहिला टूर रद्द झाल्यानंतर दुसराही टूर रद्द होण्याच्या बेतात असल्याने शुभारंभावरच या गाडीला ग्रहण लागले आहे. त्यामुळे भविष्यात तरी ही गाडी ताडोबात पोहोचणार काय? या विषयी आतापासूनच वन्यजीव प्रेमी व वनाधिकारी प्रश्न उपस्थित करीत आहेत. एकदा गाडी सुरू झाली की पर्यटक मिळतात. परंतु गाडीचा शुभारंभ होत नसल्याने त्याचा प्रचार व प्रसार कसा होणार आहे, असेही वनाधिकारी म्हणत आहेत.