रस्त्यावरच्या गुन्ह्य़ांचा ‘नवा ट्रेंड’

शेठला मुलगा झालाय..पुढे खून झालाय..पोलीस आहोत..अशा स्वरूपाच्या बतावण्या करून नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हातचलखीने लुटण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले. मात्र, भामटय़ांची ही पद्धत लक्षात आलेल्या पोलिसांनी शहरात जनजागृती मोहीमा राबविल्याने नागरिक काहीसे सावध झाले. त्यामुळे मासा गळाला लागत नसल्याने भामटय़ांनी पोलिसांच्या जनजागृतीवर उतारा म्हणून नवी शक्कल लढवली असून मुलीची छेड काढली. मुलास मारहाण केली, अशा स्वरूपाच्या बतावण्या करून हातचलाखीने दागिने लुटण्याचा प्रकार सुरू केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावरील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले असून यामध्ये सर्वाधिक गुन्हे हातचलाखीने दागिने लंपास करण्याचे आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या विशेषत: अंगावर दागिने घातलेले सावज हेरायचे, त्याला अडवून बोलण्यात गुंतवायचे किंवा भीती दाखवायची, त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास करून पोबारा करायचा, अशी भामटय़ांची गुन्हे करण्याची पद्धत आहे. साधारणत: दागिने लंपास करण्याची पद्धत सारखीच असली तरी नागरिकांना वेगवेगळ्या बतावण्या करून त्यांच्याकडील दागिने लुटले जातात. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने गेल्या काही वर्षांपासून त्यांनी शहरामध्ये विशेष जनजागृती मोहिमा हाती घेतल्या. त्यामध्ये भामटे भूलथापा देऊन कशा प्रकारे फसवणूक करीत आहेत, याची सविस्तर माहिती देऊन नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न सुरू केला. या उपक्रमामुळे नागरिक काहीसे सावध झाल्याने अशा स्वरूपाचे गुन्हे कमी झाल्याचे ठाणे पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  पोलिसांच्या जनजागृती उपक्रमामुळे सावज हाती लागत नसल्याचे लक्षात येताच भामटय़ांनी आता दागिने लुटण्यासाठी नवी कारणे शोधून काढली आहेत. बहिणीला, नातेवाईक किंवा मुलीस मारहाण केली असून तो तुझ्यासारखा दिसतो, अशी कारणे सांगून भामटे दागिने लंपास करू लागले आहेत. मात्र, गुन्हा करण्याची पद्धत तशीच ठेवली आहे. गेल्या दोन महिन्यांत ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या पाच ते सहा फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमधून ही बाब उघड झाली आहे. विशेषत: वयोवृद्धांना भामटय़ांकडून लक्ष्य केले जात होते, मात्र, नव्या कारणांच्या आधारे आता ते विद्यार्थी आणि तरुणांकडील दागिने लंपास करूलागल्याचे उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भामटय़ांनी देवघरातील पावडरने उजळून देतो, अशी बतावणी करून घरात प्रवेश केला आणि दागिने हातचलाखीने लंपास केले, तसेच मुंब्य्राच्या घटनेमध्ये भविष्यात तुमच्या घरावर संकट येणार असल्याची बतावणी करून भामटय़ांनी दागिने लंपास केले. या दोन्ही घटनांमुळे भामटय़ांनी आता घरामध्ये शिरूनही दागिने लंपास करण्यास सुरुवात केल्याचे उघड झाले आहे. यापुर्वी वाहन चालकांना दहा रुपयांची नोट खाली पडल्याचे सांगून वाहनातील ऐवज लंपास केला जात होता. मात्र, पोलिसांच्या जनजागृतीमुळे भामटय़ांची ही पद्धत वाहन चालकांच्या लक्षात येऊ लागली. त्यामुळे भामटे आता वाहनामधून पेट्रोल तसेच ऑइलची गळती होत असल्याची बतावणी करूलागले आहेत.