दहशतवादाशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम करण्याचा भाग म्हणून काही वाहनांना बुलेट प्रूफ टायर बसवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला खरा; पण त्यासाठी काढलेल्या निविदेला कोणीही प्रतिसाद न दिल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. तूर्तास निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देऊन कोणी पुरवठादार येतो काय याची चाचपणी करण्यात येत आहे.
स्कॉर्पिओ, रक्षक, महिंद्र या पोलिसांच्या शस्त्रसज्ज वाहनांना आणि बुलेट प्रूफ बस व काही अ‍ॅम्बेसिडर कारना बुलेटप्रूफ टायर, टय़ूबरहित रिम बसवण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी ४९५ टय़ूबरहित बुलेटप्रूफ टायरसाठी सुमारे दोन कोटी रुपयांची निविदाही काढण्यात आली. त्यासाठी माध्यमांमधून जाहिरात देण्यात आली, २२ नोव्हेंबर २०१२ ही निविदा दाखल करण्याची शेवटची तारीखही ठेवण्यात आली. पण एकही पुरवठादार पुढे आलेला नाही.
वाहन सुमारे ४५ हजार किलोमीटर चालल्यानंतर टय़ूबरहित बुलेटप्रूफ टायर बदलावे लागतात. मुंबई पोलीस दलातील काही वाहनांसाठी अशाप्रकारचे टायर वापरण्यात येत आहेत. पण २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर अशा सशस्त्र वाहनांची संख्या वाढवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यावेळी टायरला गोळी लागली तरी ते पंक्चर होत नाही आणि वाहन चालू राहते. त्यामुळे असे टायर महत्त्वाचे       आहेत.
पुरवठादारांना बहुधा अधिक मुदत हवी असावी. त्यामुळे या निविदेची मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी म्हटले आहे.