घातपात करून टाकून दिलेला आठ वर्षांच्या श्रुतिकाचा मृतदेह कोतवाली पोलिसांनी आज अंत्यविधीसाठी थोरात कुटुंबीयांच्या हवाली केला. दरम्यान, तपासासाठी कोतवाली पोलिसांची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी संशयावरून काल दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती, मात्र त्यांच्याकडून काही ठोस धागेदोरे मिळाले नसल्याचे समजले. त्यामुळे खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केडगावच्या वैष्णवीनगरमधील श्रुतिका महेंद्र थोरात ही बालिका गेल्या २० ऑक्टोबरला घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. काल तिचा मृतदेह केडगाव-नेप्ती रस्त्यावरील कांदा मार्केटच्या मागे झुडपात कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहावरील फ्रॉक व पायातील चपलांवरून ती श्रुतिका असल्याची तिच्या आईची खात्री झाल्याने पोलिसांनी तो थोरात कुटुंबीयांच्या हवाली केला.
मात्र मृतदेह श्रुतिकाचाच आहे, याची खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे. त्याचा अहवाल मंगळवारी मिळणे अपेक्षित असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक हनपुडे पाटील यांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार श्रुतिकाच्या डोक्यात कठीण वस्तूने मारल्याने मोठी जखम होऊन तिचा मृत्यू झाला असावा, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
श्रुतिका शिवाजीनगरच्या शाळेत तिसरीत शिकत होती. तिचे वडील स्वस्तिक चौकात लाकडी बॅट तयार करण्याचे काम करतात तसेच पेंटर म्हणूनही काम करतात. आई धुणेभांडय़ाची कामे करते. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते, मात्र त्यांच्याकडून काही ठोस धागेदोरे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.