मुंबई-आग्रा महामार्ग आणि घोटी-सिन्नर रस्त्यावरून महिन्यापासून शासनाचा महसूल बुडवून मोठय़ा प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याने ही वाळू चोरी रोखण्यासाठी घोटी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. काही पोलिसांचे वाळू माफियांशी लागेबांधे असल्याने अंतर्गत मतभेदातून या वाळू चोरीवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याची चर्चा आहे. बुधवारी शिर्डीहून आलेल्या एका वाहनावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असली तरी याच मार्गावरून अनेक वाहने सर्रासपणे वाळू चोरी करून जात असल्याने पोलिसांच्या कारवाईविषयी संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे लाखो रुपयांचा महसूल बुडवून वाळूची वाहतूक होत असताना इगतपुरीचा महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घोटी टोल नाक्यावरील तपासणी पथक काढून घेण्यात आल्याने वाळू चोरीला अभय मिळाल्याचे दिसत आहे.
मुंबई, उपनगर व नाशिक जिल्ह्य़ात बांधकामासाटी आवश्यक असणाऱ्या वाळूची घोटी-सिन्नर आणि मुंबई-आग्रा महामार्गावरून सर्रासपणे चोरटी वाहतूक होत आहे. शासनाच्या परवानगीपेक्षा वाळूची अधिक वाहतूक या रस्त्याने होत आहे.  मालेगाव, वैजापूर, कोपरगाव आदी भागातून या वाळूची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत आहे. या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असले तरी महसूल विभागाने मात्र या वाळू चोरीकडे सपशेलपणे पाठ फिरविली आहे. वाळू चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इगतपुरी महसूल विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी घोटी टोल नाक्यावर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले होते. यामुळे शासनाच्या महसुलात वाढही झाली होती. परंतु महसूल विभागाने हा तपासणी नाका वर्षांपासून बंद केल्याने वाळू चोरटय़ांचे फावले आहे.
दरम्यान, वाळू माफियांवरील कारवाईचे अधिकार पोलिसांना दिल्यानंतर घोटी पोलिसांनी या चोरीवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन पोलीस आपआपल्या सोयीनुसार वाहनांवर कारवाई करत आहेत. मात्र अंतर्गत मतभेद असल्याने परस्परांना शह देण्यासाठी कारवाई करण्यात येत असल्याची चर्चा असून त्यामुळे पोलिसांतील अंतर्गत दुही चव्हाटय़ावर आली आहे. बुधवारी शिर्डी येथून आलेल्या एका वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर दंडात्मक कारवाई करून या नाटय़ावर पडदा टाकण्यात आला.