शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) जळीत पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्डच तयार करण्यात आला नाही, परिणामी जळीत पुरुषांना अन्य वॉर्डातच भरती करावे लागते. त्यामुळे या वॉर्डात दाखल अन्य आजारांच्या रुग्णांना संसर्ग (इन्फेक्शन) होण्याची शक्यता असल्याच्या भीतीने ते लवकर निघून जाण्याची तयारी करतात अथवा दुसऱ्या वॉर्डात दाखल करण्याची मागणी करत असल्याचे चित्र दिसून येते.
संपूर्ण भारतात सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेडिकलमध्ये ६५ वर्षांंनंतरही जळीत पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली नाही. यामागे शासनाच्या आरोग्य विभागाची उदासीनता दिसून येत आहे. मेडिकलमध्ये दर आठवडय़ात चार ते पाच जळीत पुरुष दाखल होतात. स्वतंत्र वॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्ड क्र. ७, ९, ११ किंवा १९ मध्ये दाखल केले जाते. या वॉर्डात आधीच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेले किंवा शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असतात. जळालेल्या रुग्णांना वेदना खूप होते. हवेची हलकी झुळूकही या जखमांहून गेली की तीव्र वेदना होतात. त्यामुळे या वॉर्डात कायम किंकाळ्या, आक्रोश बघावयास मिळतो. अशावेळी अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना तेथे राहणे कठीण होते.
या वॉर्डामध्ये परिचारिका आणि डॉक्टरांनाही काम करणे सोयीचे होत नाही. विशेष म्हणजे या रुग्णांना आवश्यक सोयी उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. जळालेल्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. जळीत महिला व बालकांप्रमाणेच जळीत पुरुषांनाही आवश्यक सोयी पुरवाव्यात, अशी अपेक्षा नातेवाईकांची असते. दोन वर्षांपूर्वी जळीत पुरुषांसाठी स्वतंत्र वार्ड निर्माण करण्यात यावा, असा प्रस्ताव मेडिकलच्या प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन केंद्राकडे पाठवला आहे. परंतु त्याला अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही. यासंदर्भात मेयोतील जळीत वॉर्डाचे प्रमुख डॉ. लांजेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मेयोमध्ये जळीत महिला, पुरुष व लहान बालकांसाठी एकच वॉर्ड असला तरी संसर्ग होऊ नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. चार महिलामागे एक  पुरुष असे जळीतांचे प्रमाण आहे. येथे पुरुषांना दुसऱ्या अन्य वार्डात दाखल करण्यात येत नाही. तसेच जळीत पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करावा, असा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला नाही, असेही त्यांनी सांगितले. उपचाराच्या दृष्टीने जळालेल्या पुरुषांसाठी स्वतंत्र वार्ड असणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रस्ताव पाठवलेला आहे
मेडिकलमध्ये जळीत महिला व बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. त्यामुळे जळीत पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड नसल्याने त्यांना अन्य वॉर्डात दाखल केले जातात. त्यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. यासाठी एक वर्षांपूर्वी जळीत पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नसली तरी, ती लवकरच मिळेल, असा विश्वास आहे.
डॉ. ए.बी. हेडाऊ (मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक)