धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीला सध्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील आंबेवाडी, चिंचलेखैरे, खडकेद या तीन गावांनी तत्काळ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तर, मुकणे धरणातूनही आवर्तन सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील गावांनी केली आहे. पुढील महिन्यात टंचाईच्या कचाटय़ात अधिक गावे येण्याची चिन्हे आहेत.
इगतपुरी तालुक्याला पाण्याचे कोठार समजले जात असले तरी डोंगराळ भाग असल्याने ताबडतोब आटणारे पाण्याचे स्त्रोत, निकृष्ठ प्रकल्प योजना, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वीज कंपनीची अनास्था, यामुळे योजना उदंड असल्या तरी त्या बंद पडत असल्याने तालुक्याला टंचाईची झळ सोसावी लागत आहे. आजही अनेक गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात महिलांना दुरवरून मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे.
गेल्या आठवडय़ात डोंगराळ भागातील आंबेवाडी, चिंचलेखैरे तसेच खडकेद या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरव्दारे पिण्याचे पामी पुरविण्याची मागणी केली आहे. या गावांमध्ये पाणी पुरवठय़ासाठी सार्वजनिक विहीरी असल्या तरी सद्यस्थितीत त्यांनी तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. पिण्याच्या पाण्यालाही लालफितीचा अडथळा अशी स्थिती आहे. तालुक्याकडे पाण्याचे टँकर मागितल्यास लवकर मिळत नाही. प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी केल्यास गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. यामुळे पिण्याचे पाणी मागावे तरी कोणाकडे, असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांसमोर आहे.
इगतपुरी तालुक्याजवळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ, धाडोशी, सामुंडी, गणेशगाव-विनायकनगर, कौलपेढा, उंबरदरी या गावांना तसेच वाडय़ा-पाडय़ांना टंचाई जाणवत असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. १५ दिवसांपूर्वीच याबाबतचा प्रस्ताव व निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. या गावांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. इगतपुरी तालुक्यातील पाडळी, जानोरी, अस्वली, बेलगावकुऱ्हे, नांदुरवैद्य या परिसरातही पाण्याची स्थिती भीषण आहे. पाणी आटल्याने पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीलाही पाणी नसल्याने पिके जळत आहेत.
तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने विनाविलंब मुकणे धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी बाळासाहेब भोर यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना टंचाई जाणवत असतानाही अद्याप टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. या गावांना तत्काळ पाणीपुरवठा न केल्यास तहसील, प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिला आहे.