उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी शहर आणि ग्रामीण परिसरात दहशत माजविली आहे. तालुक्यात वर्षांकाठी जवळपास १५०० जणांना भटके, पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना प्रतिबंध करणारी यंत्रणा सुस्तावलेली असल्याने उरणमधील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
उरण तालुक्यात नागरिकीकरणामुळे परिसरातील लोकसंख्या वाढली आहे.  प्रशासकीय यंत्रणेच्या कामामधील उदासीनतेमुळे येथील सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहर तसेच ग्रामीण भागात या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त आहेत.  रात्रीच्या वेळी शहरातील मोरा, कोटनाका, आनंदनगर, कामठा, पेन्शनर्स पार्क, बोरी आदी भागातून प्रवास करणाऱ्या मोटार सायकलचालकांच्या अंगावर कुत्र्यांचा घोळका भुंकत येत असल्याने भीतीमुळे त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.  रात्रपाळीत कामावरून परतणाऱ्या शहरी तसेच ग्रामीण भागातील कामगारांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वर्षांकाठी जवळपास १५०० जणांना भटके, पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाना आहे.  कुत्र्यांच्या चावण्याने होणारा रॅबिज रोग टाळण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिबंधात्मक लस गेले वर्षभरापासून या दवाखान्यात उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण न केल्याने अशा कुत्र्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती उरण पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डी.जी.जाधव यांनी दिली आहे.  
कुत्रा चावलेल्या नागरिकांवर उरणच्या  इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  या रुग्णालयात प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक  डॉ.मनोज बद्रे यांनी दिली.  दरम्यान, या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी येथील शासकीय यंत्रणेने तत्परतेने उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.