शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मागील दोन वर्षांत उत्तर महाराष्ट्रात दाखल झालेल्या एकूण ५३२ प्रकरणांत २८३ प्रकरणे मंजूर तर  १३५ प्रकरणे नामंजूर झाल्याची बाब पुढे आली आहे. विमा कंपनी व जिल्हास्तरावर प्रलंबित प्रकरणांची संख्या ९४ आहे. दोन वर्षांच्या काळात वाहन अपघात व सर्पदंश या कारणास्तव उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. विम्याची काही प्रकरणे नाकारण्यात आली. त्यात प्रामुख्याने वाहनांची अनुज्ञप्ती नसणे, अथवा चुकीची वाहन अनुज्ञप्ती ही मुख्य कारणे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
शेती व्यवसाय करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक लागणे वा अन्य कोणत्याही कारणास्तव घरातील कर्त्यां पुरुषाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडते. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने संबंधितांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने शेतकरी जनता अपघात विमा योजनेची अंमलबजावणी केली आहे. सात-बारा उताऱ्यावर नांव असलेल्या १० ते ७५ वयोगटातील शेतकरी अपघात विमा योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१५ या कालावधीसाठी ही योजना उत्तर महाराष्ट्रात लागू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी प्रती शेतकरी ११ रुपये दर निश्चित झाला. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील विहित निकषानुसार सात-बारा उताऱ्यावर नांव असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे शासनाने विमा कंपनीला भरले आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अकस्मात मृत्यू झाल्यास कुटुंबियांना एक लाख रुपये, अपंगत्व आल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. मागील दोन वर्षांत उत्तर महाराष्ट्रात ५३२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. वाहन अपघात व सर्प दंश या कारणास्तव सर्वाधिक मृत्यू झाल्याचे विभागीय कृषी विभागाकडून सांगण्यात आले. ही प्रकरणे कृषी विभागामार्फत संबंधित विमा कंपन्यांकडे सादर करण्यात आली. त्यातील २८३ प्रकरणात कंपनीने संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम दिली. उर्वरित १३५ प्रकरणे वेगवेगळ्या कारणास्तव नामंजूर करण्यात आली. जवळपास ९४ प्रकरणे विमा कंपनी अथवा जिल्हास्तरावर प्रलंबित आहेत. अपघाती मृत्यूच्या प्रकरणात वाहनधारकांकडे वाहन अनुज्ञप्ती नसणे, अनुज्ञप्ती असली तरी ती संबंधित वाहनाची नसणे अशी काही कारणे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
२०१२-१३ वर्षांत नाशिक जिल्ह्यात १५४, धुळे ६९, नंदुरबार २० आणि जळगाव जिल्ह्यात १२२ शेतकऱ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. या वर्षांत एकूण ३६५ प्रकरणे विमा कंपनीसमोर सादर करण्यात आली. त्यातील १९९ प्रकरणे विमा कंपनीने मंजूर केली तर १४७ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. २०१३-१४ या वर्षांत नाशिक जिल्ह्यात ७३, धुळे ३१, नंदुरबार ६, जळगाव ५७ असे एकूण १६७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यातील १०५ प्रकरणे विमा कंपनीकडे सादर करण्यात आली. यापैकी केवळ ८४ प्रकरणे मंजूर झाली आहेत. विमा कंपन्यांनी आठ प्रकरणे नामंजूर केली. जिल्हास्तरावर ६२ प्रकरणे पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना नव्याने लागू झाली असून उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला विमा संरक्षण देण्यात आले आहे.