भाजपच्या नियोजित मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातील किती जणांना स्थान मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी १४ जागांवर भाजपने यश मिळविले. त्यात मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासह भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे आणि सलग पाचवेळा निवडून आलेले गिरीश महाजन तसेच दोनवेळा खासदार आणि दुसऱ्यांचा आमदार झालेले ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे या ज्येष्ठांचा मंत्रिपदासाठी प्राधान्यक्रमाने विचार होऊ शकतो. निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे अनुभव असला तरी त्यांचा मंत्रिपदासाठी विचार होईल याची
शाश्वती नाही. आदिवासी विकास खात्यातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले आहेत. नाशिकमधून उच्चशिक्षित प्रा. देवयानी फरांदे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक म्हणजे १४ जागांवर विजय संपादित केला. या निकालाने भाजप हा उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास पक्षाला १० जागांचा फायदा झाला. गतवेळी त्यांचे संख्याबळ केवळ चार होते. नाशिक जिल्ह्यात भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप व डॉ. राहुल आहेर यांनी विजय मिळवला. जळगावमध्ये एकनाथ खडसे, सुरेश भोळे, गिरीश महाजन, उन्मेष पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे हे विजयी झाले. धुळ्यात भाजपचे जयकुमार रावल यांनी शिंदखेडय़ातून सलग तिसऱ्यांदा आमदारकी राखली. त्यांच्यासह भाजपचे अनिल गोटे विजयी झाले. नंदुरबार जिल्ह्यात डॉ. विजयकुमार गावित व उदेसिंग पाडवी यांनी विजय मिळविला आहे. मंत्रिमंडळासाठी नावे निश्चित करताना ज्येष्ठता आणि अधिकाधिक जिल्ह्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. माजी विरोधी पक्षनेते खडसे यांचे नांव थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नांवावर आहे. पक्षातील सर्वात ज्येष्ठ नेते असणाऱ्या खडसे यांनी युती शासनाच्या काळात पाटबंधारेमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. हे पद न मिळाल्यास त्यांना सर्वात महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांचा अनुभवही काही कमी नाही. जामनेर मतदारसंघातून सलग पाचवेळा ते विजयी झाले आहेत. त्यांनाही मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान मिळण्याची भाजप पदाधिकाऱ्यांना खात्री आहे. याच भागातील हरिभाऊ जावळे हेदेखील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. सलग दोन वेळा खासदार आणि दुसऱ्यांचा आमदार बनलेल्या जावळे यांच्याकडे पक्षाला दुर्लक्ष करता येणार नाही. जळगाव जिल्ह्यात मंत्रिपदासाठी तीन दावेदार असले तरी नाशिकमधील सर्व चेहेरे एकदम नवीन आहेत. नगरसेवक असणारे चार उमेदवार यंदा विधानसभेत पोहोचले आहेत. महिलांना प्राधान्यक्रम देण्याच्या भूमिकेतून भाजप सलग तीन वेळा नगरसेवक आणि माजी उपमहापौरपद भूषविणाऱ्या प्रा. देवयानी फरांदे यांच्या नावाचा विचार करू शकतो. एम. एस्सी.चे (मायक्रोबायलॉजी) शिक्षण घेतलेल्या फरांदे या प्राध्यापिका असून सुशिक्षित चेहेरा म्हणून पक्ष त्यांना पुढे करू शकतो. धुळे जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले जयकुमार रावलही या स्पर्धेत राहू शकतात. नंदुरबार जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यास मंत्रिपद देण्यास पक्षाला अडचणीचे ठरू शकते. भाजपच्या तिकिटावर आमदार झालेल्या डॉ. गावित यांच्याकडे मंत्रिपदाच्या जबाबदारीचा अनुभव आहे. आदिवासी विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन अशा विभागांची धुरा त्यांनी आधी सांभाळली आहे. तथापि, आदिवासी विकास विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या स्थितीत भाजप डॉ. गावितांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतो काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्याऐवजी पक्षाकडून ज्येष्ठ नेते उदेसिंग पाडवी यांना संधी दिली जाऊ शकते.