उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात चित्तवेधक लढती होत असून त्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीवर या दिग्गजांची पुढील राजकीय वाटचाल अवलंबून आहे. एकेका जागेचे महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी आणि महायुतीने आपल्या आहे त्या जागा कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतानाच विरोधकांची जागा हिसकावण्याची व्यूहरचना केली आहे.
नाशिक
नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेस आघाडी, महायुती व मनसे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. काँग्रेस आघाडीतर्फे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात कडवी झुंज आहे. या शिवाय, आम आदमी पक्षाचे विजय पांढरे, बसपाकडून दिनकर पाटील तर डाव्या आघाडीचे अ‍ॅड. तानाजी जायभावे हे उमेदवारही रिंगणात आहेत. नऊ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
ही जागा राष्ट्रवादीबरोबर शिवसेना व मनसेनेही प्रतिष्ठेची केली आहे. या पक्षांचे प्रमुख नेत्यांनी ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करून प्रचाराची राळ उडविली होती. या लक्षवेधी लढतीत नेमकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
धुळे
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरिश पटेल आणि महायुतीचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात मुख्य लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात असून त्यातील ११ जण अल्पसंख्याक आहेत.
मतविभाजन टाळण्याचा आघाडीने आटोकाट प्रयत्न केला. मोदींच्या सुप्त लाटेविषयी चर्चा बरीच होत असली तरी तिचा प्रत्यक्ष कितपत प्रभाव पडणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खुद्द मोदी यांनी या ठिकाणी सभा घेतली. काँग्रेसनेही प्रचारात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आपचे अन्सारी निहाल अहमद मोहम्मद हारुण तर समाजवादी पक्षाकडून निहाल अहमद अ. रहेमान हे उमेदवार रिंगणात आहेत. गतवेळी हातातून गेलेली ही जागा ताब्यात घेण्यासाठी आघाडीने जय्यत तयारी केली असताना ही जागा राखण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.
नंदुरबार
सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर सलग नऊ निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व राखणारे आघाडीचे माणिकराव गावित सलग दहाव्यांदा विजय मिळविण्याचा विक्रम करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना महायुतीच्या डॉ. हिना गावित यांनी कडवे आव्हान दिले असून ही लढत रंगतदार होणार आहे. या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. परंतु, मुख्य लढत महायुती व काँग्रेस आघाडीत होणार आहे. डॉ. हिना यांच्यासाठी माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. गुजरातला लागून असलेल्या या जिल्ह्यात मोदीलाटेचा परिणाम होईल असा भाजपचा अंदाज असला तरी स्वातंत्र्यापासून आदिवासीबहुल हा मतदारसंघ काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील या लढतीकडे सर्वाचे लक्ष आहे.
दिंडोरी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे हरिश्चंद्र चव्हाण आणि आघाडीच्या डॉ. भारती पवार यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण ११ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यात उपरोक्त उमेदवारांसह माकपचे हेमंत वाघेरे, बसपाचे शरद माळी, आम आदमी पक्षाचे प्रा. ज्ञानेश्वर माळी, भारिप बहुजन महासंघाचे प्रभात सोनवणे यांच्यासह चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सलग दोन वेळा निवडून आलेले खा. चव्हाण ‘हॅट्ट्रिक’ करण्याच्या तयारीत असले तरी आघाडीच्या डॉ. पवार यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.
जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे खा. ए. टी. पाटील आणि काँग्रेस आघाडीतर्फे सतीश पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्षातर्फे डॉ. संग्राम पाटील व इतरही काही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत तर नऊ अपक्ष उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. गतवेळी ही जागा भाजपच्या ताब्यात होती. ती हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसली आहे. मनसेने उभा न केलेला उमेदवार, खान्देश विकास आघाडी व शिवसेनेचे धोरण या घटकांमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली
आहे.
रावेर
रावेर मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीच्या रक्षा खडसे आणि काँग्रेस आघाडीचे मनीष जैन यांच्यात मुख्य लढत होणार आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांना अंतिम क्षणी बदलून ही उमेदवारी रक्षा खडसेंना बहाल करण्यात आली. आघाडीच्या जैन यांना पक्षांतर्गत मतभेदांचा सामना करावा लागला. त्यात काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. आम आदमी पक्षाचे राजीव शर्मा, समाजवादी पक्षाकडून मोहम्मद खाटीक रिंगणात आहेत.