शहरातील रस्ते बनवताना वृक्षारोपणाच्या जबाबदारीचे उल्लंघन करणाऱ्या आयआरबी कंपनी व रस्तेविकास महामंडळावर कारवाई करणारी नोटीस तातडीने बजावण्यात येईल. त्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वृक्षारोपण करण्यास भाग पाडण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी बुधवारी टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांना दिली.    
टोलविरोधी कृती समितीच्या वतीने बुधवारी सायंकाळी आयुक्त बिदरी यांच्याशी वृक्षारोपणाच्या विषयावर चर्चा केली. कोल्हापूर शहरामध्ये रस्ते बनविण्याचे काम आयआरबी कंपनीने केले आहे. २२० कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार केले आहेत. रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने त्या विरोधात शहरात जनआंदोलन उभारले आहे. रस्ते बनवताना हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. काढून टाकण्यात आलेल्या वृक्षांऐवजी नव्याने वृक्षारोपण करण्याची अट आयआरबी कंपनीला घालण्यात आली होती. याअंतर्गत सुमारे ४ हजार वृक्ष लावणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या कंपनीने मोजकीच झाडे लावून नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली होती. न्यायालयाने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचे आदेश दिले होते. ही बाब टोलविरोधी कृती समितीने आयुक्त बिदरी यांच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भातील कायदेशीर तपशील व पुरावे अ‍ॅड. केदार मुनिश्वर यांनी सादर केले. आयआरबी कंपनीस वृक्षारोपण करण्यास भाग पाडण्याचे अधिकार महापालिकेत असल्याने आयुक्तांनी त्याचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले. समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, दिलीप पोवार, चंद्रकांत यादव, अशोक पोवार, गायत्री निंबाळकर, बाबा महाडिक, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, दिलीप देसाई, जयकुमार शिंदे आदींनी मत मांडले. त्यानंतर आयुक्तांनी वरीलप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले.