जेएनपीटी बंदरातील वाढत्या वाहतुकीवर उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्यमार्ग मंत्रालयाने उरणमधील जेएनपीटी ते पळस्पे फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व जेएनपीटी ते आम्रमार्ग नवी मुंबई दरम्यानच्या रस्त्याचे आठ व सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मात्र याच रस्त्याचे चौपदरीकरण करताना यापूर्वी जासई परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे मोबदले मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेएनपीटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब तसेच राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही रस्त्यांचे आठ-सहा पदरी रुंदीकरण करण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेले होते. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्यमार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय राज्य महामार्ग अधिनियम १९५६ नुसार भूसंपादनासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेसंदर्भात कोणाच्या हरकती असल्यास त्या नोंदविण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे सध्याच्या उरण-पनवेल रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करीत असताना जासई परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी जमिनी संपादित करीत असताना येथील शेतकऱ्यांच्या मागील भूसंपादनाचे वाढीव दराने मोबदले, गावासाठी नागरी सुविधा, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन, भूसंपादनानंतर शेतकऱ्यांच्या वारसांना रोजगाराची हमी आदी मागण्या मान्य केल्याशिवाय भूसंपादन करू दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची असल्याचे मत स्थानिक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.