सर्कस म्हटली की खुल्या मैदानावर रंगीबेरंगी कापडाचा असंख्य दोरखंडांनी बांधलेला प्रचंड तंबू, या तंबूच्या मध्यभागीचे मोठे रिंगण, रिंगणाच्या भोवताली दाटीवाटीने मांडलेल्या खुच्र्या असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. रिंगणाच्या मध्यभागी झुलणारे वेगवेगळ्या आकाराचे दोरखंड, आजुबाजूची प्रकाशयोजना, हवेत कसरती करणाऱ्या कलाकारांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेली मोठी जाळी पाहता हा जामानिमा उभारण्यासाठी किती जणांचे श्रम लागले असतील याची कल्पना येते. पण, हीच सर्कस वातानुकुलीत थिएटरमध्ये सादर केली गेली तर.. तंबूमध्ये उंचावर कसरती करणारे कलाकार, रिंगणात मध्येच येणारे हत्ती, घोडे, कुत्रे ही सगळी सर्कशीतली गंमत थिएटरमध्ये कशी दिसेल, याचा अनुभव थिएटरमध्ये घेण्याची संधी मुंबईकरांना ‘जागतिक सर्कस दिना’निमित्ताने मिळणार आहे. ‘पृथ्वी थिएटर’मध्ये सुप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे २० आणि २१ एप्रिल असे सलग दोन दिवस प्रत्येकी चार या प्रमाणे आठ खेळ होणार आहेत.
सर्कशीचा प्रयोग थिएटरमध्ये पाहण्याची संधी एरवी मुंबईकरांना मिळाली नसती. पण, मुंबईत सर्कशीला लागणारी मैदानेच मिळणे कठीण झाल्याने आता आयोजक निरनिराळे प्रयोग करू लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे परदेशातील सर्कशींप्रमाणे थिएटरमध्ये खेळ सादर करणे. पृथ्वी थिएटरमध्ये सर्कशीचे आयोजन करण्याची ही दुसरी खेप आहे. सर्कशीतील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पृथ्वीच्या संजना कपूर यांनी काही वर्षांपूर्वी स्वस्तात हे थिएटर रॅम्बो सर्कसला उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी प्रेक्षकांनी थिएटरमधील शोला तुफान गर्दी केली होती. यावेळेस पृथ्वीच्या कुणाल कपूर यांनी मदतीचा हात दिल्याने पृथ्वीमध्ये शो आयोजित करणे शक्य झाले आहे.
या सर्कशीत भारतीय कलाकारांबरोबरच इथोपिया, अर्जेंटिना, नेपाळ आदी परदेशातील कलाकारांच्या कसरती पाहायला मिळतील. सकाळी ११, दुपारी ३ सायंकाळी ५ आणि ७ या प्रमाणे प्रत्येक दिवशी चार खेळ होणार आहेत.
‘पृथ्वी थिएटरमध्ये आपली कला सादर करण्याचा एक वेगळाच आनंद सर्कशीच्या कलाकारांना मिळतो. या थिएटरच्या निर्मितीत आणि व्यवस्थापनात राज कपूर यांच्या घराण्याचा मोठा हात आहे. सर्कशीतील कलाकारांच्या जीवनावर आधारित ‘मेरा नाम जोकर’मुळे तर राज कपूर यांच्याविषयी सर्कशीतील वृद्धांपासून तरूण कलाकारांपर्यंत सगळ्यांना प्रेमाची भावना आहे. त्यामुळे, व्यासपीठामागील थिएटरच्या मेकअप रूममध्ये बसून मेकअप करणाऱ्या कलाकारांना तर या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा मिळते,’ असे रॅम्बो सर्कसचे सुजीत दिलीप सांगतात.