पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठाणे महापालिकेने हरित जनपथानंतर आता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच इतर दवाखान्यामध्ये पर्यावरणस्नेही काथ्याच्या गाद्या देण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीमध्ये संमत करण्यात आला. या प्रस्तावानुसार, २४७ काथ्याच्या गाद्या खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी नऊ लाख ९१ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची सुमारे पाचशे खाटांची क्षमता असून रुग्णालयामध्ये महिन्याला सरासरी दोन हजार रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. त्यामुळे दिवसाला सरासरी ७० टक्के खाटांवर रुग्ण उपचार घेत असतात. तसेच रुग्णालयामध्ये महिन्याला सरासरी ७३० शस्त्रक्रिया आणि ३५० प्रसूती होते. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये भरती झालेल्या रुग्णावर पाच ते सहा दिवस उपचार सुरू असतात, त्यासाठी त्याला खाट, गादी तसेच रुग्णालयीन कपडे रुग्णालयातर्फे उपलब्ध करून दिले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत रुग्णालयातील सर्व कक्ष, बाह्य़ रुग्ण विभाग तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांतील बहुतेक गाद्या खराब झाल्या असून काही गाद्या पूर्णपणे निरुपयोगी झाल्यामुळे काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्णालयामध्ये नवीन गाद्या घेण्यासंबंधी प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये कापूस तसेच फोमऐवजी काथ्याच्या गाद्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कापूस तसेच फोमच्या गाद्या सततच्या वापरामुळे आणि रुग्णांच्या शरीरातील स्राव शोषल्यामुळे लवकर खराब होतात. मात्र, त्या तुलनेत काथ्याच्या गाद्या चांगल्या स्थितीत असल्याचे एका सर्वेक्षणातून महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. तसेच काथ्याच्या गाद्या जास्त टिकाऊ व मजबूत असून त्या निकामी झाल्यानंतर त्याची विल्हेवाट सहजतेने होऊ शकते. त्यामुळे या गाद्यांपासून पर्यावरणास कोणताही धोका निर्माण होऊ शकत नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने प्रस्तावामध्ये केला आहे. कळवा रुग्णालयाकरिता विविध प्रकारच्या १९० तर विविध दवाखान्यांसाठी ५७ काथ्याच्या गाद्या खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी नऊ लाख ९१ हजार ९९३ रुपये खर्च येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.