‘अमुक एक गोळी घ्या आणि आपली उंची वाढवा..’ ‘दिवसभराच्या कामाच्या तणावामुळे त्रासलाय? अमुक एक पावडर दुधात मिसळून खा आणि तणावापासून मुक्ती मिळवा..’ अशा रात्री उशीरा किंवा पहाटे-पहाटे ठरावीक वाहिन्यांवर झळकणाऱ्या जाहिराती ‘आकर्षक’ भासत असल्या तरी त्यांच्या भूलभुलैय्याला बळी पडू नका. कारण, गोळ्यांपासून तुमची उंची तर वाढणार नाहीच. पण, कदाचित जाडी मात्र वाढू शकेल. कारण, या प्रकारचा दावा करणारी बहुतांश औषधे किंवा फॉम्र्युले बनावट असून आवश्यक त्या परिणामाऐवजी दुष्परिणाम करणारी आहेत, असा इशारा आता ‘अन्न आणि औषधे प्रशासना’ने (एफडीए) पुन्हा दिला आहे. इतकेच नव्हे तर बनावट औषधांचे बळी पडलेल्या ग्राहकांच्या तक्रारीवरून एफडीएने या औषधांच्या विरोधात कारवाईची मोहिमही सुरू केली आहे.
सुदैवाने एफडीएच्या या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानेही एका निकालाप्रकरणी हिरवा कंदिल दाखविल्याने लवकरच या प्रकारच्या जाहिरातीही दूरचित्रवाणीवरून हद्दपार होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत एफडीएने अशा तब्बल १० हजार जाहिरातींना पायबंद घातला आहे. पण, जाहिरातींवर बंदी आणूनही बाजारात या प्रकारचा बनावट दावा करणाऱ्या औषधे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे, ग्राहकांनी त्यापासून सावध राहावे, असा इशारा एफडीएचे सह आयुक्त के. बी. शेंडे यांनी दिला.
ड्रग्ज अ‍ॅण्ड मॅजिक रेमेडिज (ऑब्जेक्शनल अ‍ॅडव्‍‌र्हटाईजमेंट्स) अ‍ॅक्ट, १९५४ नुसार उंची किंवा वजन वाढणे, वजन घटविणे, कामप्रेरणा जागविण्याचा दावा करणारी ही औषधे परिणामकारक असली तरीही त्यांची जाहिरात करण्याला बंदी आहे. एफडीएने या औषधांच्या जाहिरातींवर बंदी आणल्यानंतर ‘स्टेप अप बॉडी ग्रोथ फॉम्र्युला’ने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, लोकांनी स्वत:च औषधोपचार करू नये, यासाठी हा कायदा आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने एफडीएच्या कारवाईला बळकटी आली आहे. २०११-१२मध्ये एफडीएने ‘फूड अ‍ॅण्ड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अ‍ॅक्ट’अंतर्गत राज्यभरात तब्बल ६७७ व्यक्तींवर कारवाई केली होती. यात अन्नधान्य, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पॅकबंद अन्नपदार्थ, पेय, तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश होता.
अवास्तव दावा करणारी औषधे आजही बाजारात सर्रास उपलब्ध होतात. ग्राहकांनी त्यांच्या दाव्याला बळी पडू नये. कारण, या औषधांमुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. अशा प्रकारची औषधे आढळून आल्यास ग्राहकांनी त्याची तक्रार करावी, असे आवाहन शेंडे यांनी केले.