सुपरफास्ट गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता आहे. गाडी सुटण्याची वेळ झाली असेल आणि तिकीट खिडकीवर लांब रांग असल्याने विनातिकीट गाडीत बसणाऱ्यांना थेट गाडीत तिकीट खरेदी करण्याची सुविधा लवकरच सुरू होत आहे. यासाठी तिकीट तपासणीसांना तिकीट यंत्र दिले जाणार असून, या यंत्राद्वारे प्रतीक्षा तिकीट असणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या ‘बर्थ’ची स्थितीही जाणून घेता येणार आहे.
एकीकडे तिकीट खिडकीवर लांब रांग आणि दुसरीकडे रवाना होण्यास सज्ज फलाटावर उभी असलेली गाडी. तिकीट खरेदी करणे आवश्यक. पण रांगेत उभे राहिल्यास गाडी सुटण्याची भीती, अशी अवस्था अनेक सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्यांची आणि ऐनवेळी प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांची होते. यातून आता लवकरच सुटका होणार आहे. अशा प्रवाशांना दिलासा देणारी सुविधा रेल्वे सुरू करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. गाडीचे तिकीट गाडीत मिळू शकणार आहे. सध्या ही सुविधा उत्तर रेल्वेने सुपरफास्ट गाडय़ांमध्ये सुरू केली आहे. लवकरच इतर गाडय़ांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी तिकीट तपासणीसांना तिकीट यंत्रे (हॅड हेल्ड मशीन) देण्यात येणार आहेत.
उत्तर रेल्वेने पहिल्या टप्प्यात सुपरफास्ट गाडय़ात ही सुविधा सुरू केली आहे. त्या गाडय़ांमध्ये तिकीट तपासणीसांना तिकीट यंत्रे देण्यात आली आहेत. ही यंत्रे तिकीट आरक्षण केंद्राच्या सव्‍‌र्हरशी जोडली जाणार आहेत. यामुळे गाडीच्या प्रत्येक डब्यातील रिकाम्या ‘बर्थ’ची स्थिती आणि कोणत्या स्थानकावर प्रवासी उतरणार आहे, याबद्दलची माहिती मिळत राहणार आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अट आहे. ती न पाळल्यास टीटीईला कारवाई करण्याची आयतीच संधीही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गाडीत चढता क्षणीच तिकीट न घेता गाडीत चढल्याची सूचना टीटीईला द्यावी लागणार आहे. टीटीई अशा प्रवाशांकडून निश्चित भाडय़ापेक्षा दहा रुपये अधिक घेऊन या यंत्राद्वारे तिकीट देईल. याशिवाय यंत्राद्वारे प्रतीक्षा यादीतील प्रवाशाला ‘बर्थ’ रिकामे होताच ते मिळू शकणार आहे.

गाडीत चढल्याबरोबर सांगा
विनातिकीट गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढताच तिकीट तपासणीसांना सांगावे लागेल की, त्यांनी तिकीट घेतलेले नाही. यंत्राद्वारे तिकीट घ्यायचे आहे. प्रवाशाने असे न केल्यास आणि तिकीट तपासणीच्या वेळी विनातिकीट प्रवासी आढळल्यास टीटीई त्यांना दंड करण्यास मोकळा आहे.

‘टीटीई’च्या मनमानीला वेसन
गाडी सुटेल म्हणून घाई गडबडीत गाडीत चढणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट तपासणीस मर्जीप्रमाणे दंड आणि पैसे उखळतात. शिवाय प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ‘बर्थ’ रिकामा असूनही दिला जात नाही. ज्यांच्याकडून रक्कम मिळेल, त्यांना तो बर्थ दिला जातो. यामुळे प्रतीक्षा तिकीट असणाऱ्या प्रवाशांना बर्थ मिळत नाही. त्यांना एखाद्या सहप्रवाशाशी तडजोड करून कसाबसा प्रवास करावा लागतो. परंतु आता ‘हँड हेल्ड मशीन’मध्ये बर्थची स्थिती जाणून घेता येणार आहे. त्यामुळे टीटीईची मनमानी काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे.