शहरातील पर्जन्यवृक्ष एकापाठोपाठ मृत्युमुखी पडत चालल्याची आता महापालिकेने गंभीर दखल घेतली असून रासायनिक, यांत्रिक आणि जैविक उपायांनंतर सेंद्रिय औषधांची मात्रा वृक्षांना दिली जात आहे. डासांवाटे मलेरिया आणि डेंग्यू पसरतो, त्याचप्रमाणे ‘पांढरा मावा’ या कीटकामुळे (मिली बग) पर्जन्यवृक्षांमध्ये पानगळतीचा आजार सुरू झाल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. आता हा कीटक घालवण्यासाठी बंगलोर, पुणे, कोकण कृषी विद्यापीठातून आणखी तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले आहे.
पर्जन्यवृक्षांना २०११ पासून कीटकबाधा झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या पाहणीनुसार आजमितीला शहरातील ५०० पर्जन्यवृक्षांवर पांढरा मावा कीटकाची लागण आहे. दहिसर ते गोरेगाव, तसेच वांद्रे-कुर्ला संकुल, खार या ठिकाणच्या पर्जन्यवृक्षांना मोठय़ा प्रमाणात संसर्ग झाला आहे. याआधी पाण्याचा मारा, वृक्षांची छाटणी, रासायनिक कीटकनाशके, कीटक खाणारे भुंगे असे उपाय केले. मात्र त्यांना मर्यादित यश मिळाले. मुसळधार पावसानंतरही या वृक्षांवरील संसर्ग गेला नसल्याने उद्यान विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. रत्नागिरीचे कृषितज्ज्ञ मनीष गाडगीळ यांनी झाडांची पाहणी केली. पांढरा मावा कीटक केवळ झाडांवर पोसले जात नसून त्यांच्यावाटे झाडांमध्ये पानगळतीचा आजारही पसरत आहे. श्रीलंका आणि दक्षिण भारतात अननसाच्या झुडपावरही अशा प्रकारे कीटकांद्वारे आजार पसरला होता. त्यातच लाल मुंग्या या कीटकांच्या मदतीला आल्या असून त्यांच्या नैसर्गिक शत्रूंपासून त्यांचे रक्षण करत आहेत, असे गाडगीळ यांचे मत आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणे चारकोप येथील काही झाडांवर सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. पर्जन्यवृक्षांची समस्या गंभीर होत असल्याने उद्यान अधिकाऱ्यांनी इतर उपायही चाचपून पाहण्यास सुरुवात केली आहे. बंगलोर येथील ‘नॅशनल ब्युरो ऑफ अॅग्रिकल्चरली इम्पॉर्टण्ट इन्सेक्ट’, ‘कोकण कृषी विद्यापीठ’ आणि पुणे येथील कृषी महाविद्यालय येथील तज्ज्ञांनाही पर्जन्यवृक्षांची समस्या सोडवण्यासाठी २५ सप्टेंबरला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी विजय हिरे यांनी दिली.
आतापर्यंत केलेले उपाय
’रासायनिक उपाय – फर्टिरा किंवा रिजेंटसारखी रासायनिक कीटकनाशके झाडांच्या मुळाशी टाकण्यात आली. त्यानंतर मुळांवाटे ती झाडांमध्ये पसरून कीटकांवर नियंत्रण ठेवू शकतात. मात्र हा उपाय लागू पडला नाही.
’यांत्रिक उपाय – कीटक लागलेल्या फांद्या कापून त्या नष्ट करण्यात आल्या. मात्र यातूनही फारसे काही हाती लागले नाही.
’जैविक उपाय – लोकरी मावा कीटक खाणाऱ्या भुंग्यांना कांदिवली तसेच बोरिवली येथील काही झाडांवर सोडण्यात आले. पुण्यावरून आलेल्या या लेडी बगनी लोकरी मावा कीटकांची संख्या थोडी कमी केली. मात्र मुळातच कीटकांची संख्या प्रचंड वाढल्याने हा उपाय अपुरा ठरला.
’आता सेंद्रिय उपाय – हळद, आले, लसूण, कडुनिंब अशा औषधी वनस्पतींपासून बनवलेल्या कीटकनाशकांमुळे जास्वंदीवरील पांढरा मावा जात असल्याचा दावा. पर्जन्यवृक्षावरील परिणाम समजण्यासाठी वाट पाहावी लागेल.